घनःश्याम कडू
उरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करताना जेएनपीटी बंदर येथे 14 कंटेनरमधून आलेली 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सुमारे 371 मेट्रिक टन सुपारी जप्त केली आहे. या प्रकरणात खोट्या घोषणा करुन सुमारे 36 कोटी रुपयांचा कर चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे बोलले जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी 31 ऑगस्ट रोजी कारवाई करुन जवाहरलाल नेहरु बंदरात सुपारी असलेले कंटेनर्स ताब्यात घेतले. तळेगाव येथील आंतरदेशीय कंटेनर डेपो येथे पाठवण्यात येणार असलेल्या या कंटेनर्समध्ये सुपार्या लपवलेल्या आहेत, असा संशय आल्याने अधिकार्यांनी ही कारवाई केली. तळेगाव येथील डेपोमध्ये पोहोचण्यापूर्वीच हे कंटेनर चोरण्यात येतील किंवा बदलले जाऊन दुसर्या मार्गाने पाठवण्यात येतील, असा संशय आल्याने हा माल केलेल्या घोषणेनुसार कंटेनरमध्ये कॅल्शियम नायट्रेट होते. पण ती खोटी माहिती देण्यात आली होती आणि सर्व कंटेनरमध्ये सुपारी भरण्यात आली होती. कॅल्शियम नायट्रेटच्या नावाखाली त्यांची भारतात तस्करी करण्यात येणार होती, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या कंटेनरमध्ये 32.31 कोटी रुपये किमतीची 3,71,090 किलो (371 मेट्रिक टन) सुपारीची संपूर्ण खेप जप्त करण्यात आल्याचे महसूल संचालनालयाच्या निवेदनात म्हटले आहे. फोडलेल्या सुपार्यांवर त्यांच्या एकूण किमतीच्या 110 टक्के आयात शुल्क लागू आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अंदाजे 36 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे अधिकार्याने सांगितले.
याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने जेएनपीटी येथे मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करुन सुपारीच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. न्हावा-शेवा येथे दोन वेगळ्या कंटेनरमधून सुमारे 4.40 कोटी रुपये किमतीचे सुमारे 50 टन सुपारी काजू जप्त केले होते.
