• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिटफंड प्रकरणातील एकाचा जामीन अर्ज फेटाळला तर एकाचा जामीन रद्द

ByEditor

Sep 11, 2023

घनःश्याम कडू
उरण :
उरणमधील 400 कोटींहून अधिक रकमेचा चिटफंड घोटाळा गेली काही महिन्यांपासून गाजत आहे. या चिटफंड प्रकरणातील अटकेत असलेल्या सुप्रिया पाटील व तिच्या सहकार्‍यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर हजेरीच्या अटीवर जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या सतीश गावंड याचाही जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. या दोन्ही प्रकरणात दोन हजारांहून अधिकांची फसवणूक झाली असल्याचे समजते.

चिटफंड चालविणार्‍या दोन गटांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून दोन हजार गुंतवणूकदारांची 400 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी सुप्रिया पाटील, जगन्नाथ ठाकूर, हितेश कडू, अक्षय कोळी व प्रणय ठाकूर अटकेत आहेत, तर फोहन कोळेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. तसेच सतीश गावंड हा फरार झाला आहे.

गेली अनेक महिन्यांपासून उरणमध्ये हा चिटफंड घोटाळा सुरू असताना याकडे राजकीय पक्ष, नेतेमंडळी, सामाजिक संघाटना, पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. अखेर एकमेकांच्या कटकारस्थानामुळे हे प्रकरण उघड होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. सतीश गावंड हा काही दिवसात दामदुप्पट करून देत असल्याने या भागात देवमाणूस म्हणून परिचित होता. त्याची वाढती प्रसिद्धी पाहून त्याला व सुप्रियाला राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. या चिटफंड प्रकरणात राजकीय, प्रतिष्ठित व पोलिसांनीही आमिषाला भुलून पैसे गुंतविले असल्याचे समजते. चिटफंड प्रकरणातील सुप्रिया पाटील अटकेत आहे, तर देवमाणूस सतीश गावंड फरार आहे. त्यातील सुप्रियाचा जामीन अर्ज फेटाळला तर सतीश गावंड याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. परंतु ठेवीदारांना रक्कम परत मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. रक्कम जर परत मिळाली नाहीतर ते आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सतीश गावंड हा जरी फरार झाला असला तरी तो व्हिडीओ व्हायरल करून अनेकांवर बेताल आरोप करीत आहे. मग याचा थांगपत्ता लागत नाही याचे आश्चर्य वाटत आहे. व्हिडीओमध्ये मला पैसे देण्याचा आव आणून इतरांना कमी लेखत आहे, मग तो ज्यांच्यावर आरोप करीत आहे, त्यांची नावे उघड करण्याची हिंमत का दाखवीत नाही. यावरून ठेवीदारांची फसवणूक करण्याची नौटंकी सतीश गावंड करीत असल्याचे उघड होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!