• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वैयत्तिक कर्ज वाटपात घोळ, बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

ByEditor

Sep 11, 2023

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्जत शाखेतील घटना

गणेश पवार
कर्जत :
बँकांमधून क्रेडिट कार्ड, कर्ज वाटप केले जातात. त्यासाठी बँकांमधून येणाऱ्या फोनचा कंटाळा देखील येतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी कर्ज प्रक्रिया राबवताना त्यांच्या नाकी नऊ येतात. कारण कर्ज देताना बँक तुम्ही ते परत करण्याची किती पात्रता ठेवता याची वारंवार पडताळणी करते. असे असताना कर्जत येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १६ जणांना बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने वैयत्तिक कर्ज वाटप केले. त्यातही त्यांची बोगस कागदपत्र कर्जासाठी जोडून. त्यामुळे साहजिकच हि खाती एनपीए झाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने बँकेच्या व्यवस्थापकावर बँकेने कारवाई करत थेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शैषव नरेंद्र नलावडे (रा. इ221 गिता अपार्टमेंट, मिठाघर रोड, मुलुंड ईस्ट, मुंबई) हे शाखा व्यवस्थपक म्हणून काम करीत होते. तेव्हा दिनांक १ जून २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत नलावडे यांनी १६ ग्राहकांना वैयत्तिक कर्ज मंजूर करून वाटप केले. मात्र वैयत्तिक कर्ज मंजुर करून वाटप करण्याची कायदेशीर प्रक्रिया रितीचे अवलंब न करता त्यांनी हा उद्योग केला. बँकेच्या एकूण १६ ग्राहकांकडून बनावट कागदपत्रे स्वीकारून त्यांच्याशी संगनमत करून त्यांनी एकूण १ कोटी ४९ लाख २६ हजार ४९६ रुपयांचे कर्ज वाटप केले होते. तसेच त्यातील काही रक्कम स्वत:च्या फायद्याकरीता वापरून रकमेचा अपहार केला. सदर ग्राहकांनी त्यातील १ कोटी रुपये रक्कम बँकेत भरली. मात्र उर्वरित ४९ लाख २६ हजार ४९६ रक्कम त्यांनी न भरल्याने त्यांचे खाते एनपीए झाले. त्यामुळे बँकेकडून चौकशी झाली असता हा प्रकार उघड झाला. बँकेचे शाखा व्यवस्थापक नलावडे व एकूण १६ ग्राहकांनी बनावट कागदपत्रे देवून ४९ लाख २६ हजार ४९६ रक्कम इतकी रक्कम न भरता अपहार करून फसवणूक केली. त्यामुळे या प्रकाराची बँकेने गांभीर्याने दखल घेत कर्जत पोलीस ठाण्यात नलावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३६/२०२३ भा.दं.वि.क. ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१, ४०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू रसेडे हे करीत आहेत. सदरचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे वरीष्ठ अर्ज क्र.७२/२०२३ जन ३९/२०२३ चे अर्जचौकशी वरून दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!