अनंत नारंगीकर
उरण : जड अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खोपटा पुल ते कोप्रोली नाका रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी १५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर २०२३ या गणेशोत्सव कालावधीमध्ये सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.

जेएनपीए बंदरामुळे उरण पुर्व विभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे या कंटेनर यार्डमधून जेएनपीए बंदरात रात्री अपरात्री खोपटा पुल ते कोप्रोली नाका या रस्त्यावरुन जड अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास हा दैनंदिन नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर्षी गणेशोत्सव मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी येत असल्याने पुर्व विभागातील नागरिक हे उरण, नवीमुंबई परिसरातील बाजारात आपआपल्या नातेवाईक मंडळींकडे ये-जा करत असतात.
त्यामुळे दरवर्षी खोपटा पुलावरील जड अवजड वाहनांच्या वर्दळीचा, वाहतूक कोंडीचा मनस्ताप हा नागरिकांना, गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. तरी यावर्षी उरण वाहतूक पोलीस शाखेने खोपटा पुलावरुन १५ सप्टेंबर ते १९ आँक्टोबर २०२३ या गणेशोत्सव कालावधी दरम्यान सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, अल्पेश कडू यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी उरण वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या सह काँग्रेस पक्षाचे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
