घन:श्याम कडू
उरण : ओएनजीसी कंपनीच्या तेलगळतीमधील बाधित शेतकरी व मच्छीमार बांधवांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसिलदार उद्धव कदम यांना देण्यात आली आहे.

ओएनजीसी कंपनीमधून वारंवार तेलगळती होऊन शेतकरी, मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतीत वारंवार नुकसान भरपाईची मागणी करूनही दिली जात नसल्याचा आरोप बाधितांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कंपनी विषयी नाराजीचा सूर निघत आहे. यामुळे ओएनजीसी कंपनीतून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली होती. मात्र यानंतर ओएनजीसी कंपनीतील या तेल गळतीमुळे कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितले. जर धोका नव्हता तर तीन ते चार दिवस तेल गळती साफसफाई करण्याचे काम कसे सुरू आहे. कंपनीच्या या भूमिकेमुळे जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण होऊन त्यांनी आज मोर्चाचे आयोजन केले होते.

मोर्चा उरण तहसिल कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी संतप्त जनतेच्या भावना जाणून घेत तेल गळती झाल्याचे तहसीलदार कदम यांनी मान्य करून यासंदर्भात गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात तहसीलदार उद्धव कदम, वपोनी सतीश निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. सागर कडू, शेकाप नेते काका पाटील, सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू, व बाधित शेतकरी व मच्छीमार उपस्थित होते.
