मनसे, काँग्रेस तर्फे वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले निवेदन
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये-जा होत असते. सदर रोडवर असणाऱ्या सीएफएस व एम. टी. यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो.
खोपटे कोप्रोली 2 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी कधीकधी दोन तास वाया जातात. त्यामुळे या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. येत्या 19 तारखेपासून गणपती उत्सव सुरु होत आहे. सदर उत्सवाच्या काळामध्ये सामान्य जनतेला रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येपासून वाचवण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेपासून पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना सदर रस्त्यावर ये जा करण्यास बंदी घालून वरील समस्येचे निराकरण अशी मागणी यावेळी काँग्रेस व मनसे पक्षाच्यावतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना करण्यात आली. या मागणीचे निवेदन सुद्धा संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका चिटणीस तथा वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष अल्पेश कडू, मनसे उपतालुका अध्यक्ष मंगेश वाजेकर, मनसे उपतालुका अध्यक्ष राकेश भोईर, मनसे विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, मनसे उपविभाग अध्यक्ष श्रीरंग म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भेंडखळ ते कोप्रोली मार्गांवर व दिघोडा ते दास्तान फाटा मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांचे लवकर निरसन करण्यात यावे.अन्यथा गणपती च्या काळा फार मोठी वाहतूक कोंडी होईल.याकडे लक्ष न दिल्यास दोन्ही मार्गांवर मनसे व काँग्रेसच्या माध्यमावर लोकहितासाठी संयुक्त विद्यमाने लवकरच अंदोलन करण्यात येईल.
संदेश ठाकूर,
जिल्हाध्यक्ष मनसे.
भेंडखळ ते कोप्रोली मार्गांवर व दिघोडा ते दास्तान फाटा मार्गांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका गणेशोत्सव मध्ये भाविक भक्तांना बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या महत्वाच्या समस्याची दखल घेउन त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात.
विनोद म्हात्रे,
तालुकाध्यक्ष, काँग्रेस.
लवकरच सदर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गणेशोत्सव काळात व त्यानंतर भाविक भक्तांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेउ. सदर समस्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कळविली आहे.
संजय पवार,
पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग उरण.
