मिलिंद माने
महाड : गणेशोत्सव सणाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणार आहेत. जवळपास ५ पाच लाखाहून अधिक गणेशभक्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून कोकणात जात असल्याने वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलीस सज्ज झाले आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात वाहतूक कोंडीचा व्यत्यय टाळण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा सज्ज झाली असून पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या ४५० किमी अंतरापर्यंत महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील १९ अधिकारी आणि २३६ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
गणपती सणासाठी कोकणात येणाऱ्या गुजरातपासून मुंबई ते पुण्यापासून चाकरमानी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची दुरावस्था असल्यामुळे मागील दहा वर्षापासून मुंबई पुणे कोल्हापूर या मार्गाचा वापर करीत होते. यंदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्याने व महामार्ग बऱ्यापैकी सुस्थितीत असल्याने चालू वर्षी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खेड तालुक्यातील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तर पळस्पे फाट्यापासून इंदापूर पर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काँक्रीटची दुरुस्ती केल्याने या मार्गावरून एकेरी वाहतूक चालू होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, गुजरातमधून कोकणात गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणारे चाकरमानी आपलया वाहनाने याच मार्गावरून चालू वर्षी प्रवास करणार आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर आणि कोलाड या ठिकाणी लोणेरा फाटा या ठिकाणी दरवर्षी वाहतूक कोंडी होत असते. यंदा देखील प्रशासन या ठिकाणच्या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी यशस्वी होईल का? हा प्रश्न आजही कायम आहे. कारण माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणचा बायपास अध्याप तयार झालेला नाही. त्याच बरोबर महाड तालुक्यातील दासगाव खिंडीचे काम अर्धवट आहे आणि महाड शहरानजीक साहिल नगर या ठिकाणी देखील काम अर्धवट आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भरणा नाका, चिपळूण शहरा जवळील बहादूर शेख नाका या दोन ठिकाणी देखील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते माणगाव हा मार्ग अरुंद असल्याने अपघात मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग वाहतूक पोलीस शाखेने यंदा आपल्या बंदोबस्तात वाढ केली आहे. पनवेल पळस्पे फाटा ते कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या पळस्पे फाटा, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबा, कसाल आशा सात शाखा आहेत. या सात ठिकाणी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवे साठी महामार्ग वाहतूक शाखेतील १९ अधिकारी आणि २३६ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.त्याच बरोबर एखादे अपघात झाले तर जखमींसाठी रुग्णवाहिका तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेन उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील अपघात प्रवण क्षेत्रात व संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले कर्मचारी रात्र दिवस मोटरसायकलने पेट्रोलिंग करणार आहेत. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून वाहतूक कोंडीतून सुखकर होणार असला तरी खड्ड्यातून मात्र चाकरमान्यांची सुटका होणार नाही हे वास्तव नाकारता येत नाही
कोकणातील गणेशोत्सव
मंगळवारी १९ तारखेपासून याची सुरुवात होत आहे असे जर असले तरी शनिवार, रविवार सुट्टी असल्याने गुजरात, मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण या ठिकाणाहून आपापल्या गावी जाणारे चाकरमानी गावी जाण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळापासूनच सुरवात करतील. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून महामार्गावर महामार्ग वाहतूक शाखेतील पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीनंतर गणपती विसर्जनपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महामार्ग वाहतूक शाखेतील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
| कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी शक्यता सुरक्षते च्या दृष्टीने दिवसाचा प्रवास करावा. वेग मर्यादेवर नियंत्रण ठेऊन वाहन चालवावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. प्रवासात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास जवळच असलेल्या वाहतूक शाखेत संपर्क साधावा किंवा अडचणीच्या परस्थितीमध्ये ११२ नंबरवर संपर्क साधावा. महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडचे पोलीस उप निरीक्षक संजय भोसले यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना आवाहन केले आहे. |
