• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

ByEditor

Sep 16, 2023

उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत, रविवारी होणार मतमोजणी

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रामध्ये मतदान झाले. या मतदानाला मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून मतदारांनी केंद्रावर मतदानासाठी रांग लावली होती. त्यामुळे एक वेगळा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला. तरुणांसह वयोवृध्द, दिव्यांग मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत 724 मतदारांनी मतदान केले असून मतमोजणी रविवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जेएसएम महाविद्यालयात होणार आहे.

रायगड जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. बँकेमार्फत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आदींसह लहान मोठ्या व्यवसायिकांना उभारी देण्याचे काम जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी केले. त्यामुळे 21 जागांपैकी 18 जागांवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा याआधीच फडकला. उरलेल्या तीन जागांसाठी मतदान शनिवारी घेण्यात आले. इतर शेती सहकारी संस्था मतदार संघाच्या एक जागेसाठी आ. जयंत पाटील, महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी प्रिता चौलकर, मधुरा मधुस्टे रिंगणात होते.

अलिबागमधील नगरपरिषदेच्या उर्दू शाळा, पेणमधील सार्वजनिक विद्यालय, माणगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, खालापूरमधील प्रभाकर पाटील, शिक्षण संस्थेचे गंगाविष्णू जखोटीया मेमोरिअल इंग्लीश माध्यम शाळा या चार मतदानकेंद्रात मतदान सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाले. अलिबागसह अनेक मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यास सुरुवात केली. मतदान करण्यासाठी मतदार स्वयंस्फुर्तीने केंद्राच्या दिशेने वळले होते. एक वेगळा उत्साह प्रत्येक मतदारांच्या चेहऱ्यांवर दिसून आला. सकाळी दहा वाजेपर्यंत 181 जणांनी, दुपारी बारा वाजेपर्यंत 513 व दुपारी दोन वाजेपर्यंत 690 तसेच सायंकाळी चार वाजेपर्यंत 724 मतदारांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला .

मतदानावर दृष्टीक्षेप

केंद्र एकूण मतदार 10 – 12 – 02- 04 (दर दोन तासाची आकडेवारी )
अलिबाग 836 82 -260 – 425 – 455
पेण 118 40 – 68 – 73 – 73
माणगाव 205 36 – 84 – 89 – 90
खालापूर 210 23 – 101 – 103 – 106
एकूण 1339 181 – 513 – 690 – 724

केंद्रावर मतदारांची रांग
अलिबागसह, खालापूर, माणगाव, व पेण मतदान केंद्रामध्ये मतदान झाले. शेकापचे आ. जयंत पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, राजन पाटील, नीता पाटील, जि. प. माजी सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, बाळू पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर आदींनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांकडून प्रतिसाद मिळाला. मतदान केंद्रासमोर मतदारांची रांग लागली असल्याचे दिसून आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!