अमूलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले. काहीजण न्यायालयातदेखील गेले. हा प्रश्न खोडून काढणारा विजय असून या निवडणूकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. हा विजय सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा असून इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय आहे. याची मुहूर्त मेढ रायगड जिल्ह्यात रोवली गेली आहे, असे उदगार आ. जयंत पाटील यांनी रविवारी काढले. बँकेच्या संचालक मंडळाच्या विजयानंतर पाटील बोलत होते.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया रविवार (17 सप्टेंबर) पार पडली. एकूण 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 18 जागांवर शेकापचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले होते. शनिवारी जिल्ह्यातील अलिबागसह, खालापूर, माणगाव व पेण मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. रविवारी येथील अॅड. दत्ता पाटील लाॅ काॅलेजच्या सभागृहात मतमोजणी पार पडली. विद्यमान अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह दोन महिला उमेदवार विजयी झाले.

यावेळी माजी आ. पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्या चित्रा पाटील, प्रदिप नाईक, अॅड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अॅड. परेश देशमुख, यतीन घरत, संदीप घरत, संतोष जंगम, अॅड. सचिन जोशी, सुरेश घरत, विलास म्हात्र, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख प्रिती पाटील, अशोक प्रधान, नागेश कुलकर्णी असे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, व कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, गेली तीन महिने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. मतदारांची प्राथमिक यादी आणण्यापासून काहींनी अडथळे आणले. मात्र आपण पक्षभेद विसरून काम करीत असल्याने हा विजय मिळाला आहे. यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. चांगल्या मतांनी सर्व संचालक निवडून आले आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळीतील सर्वांनी पक्ष, मतभेद बाजूला ठेवून शेकापला भरघोस मतदान केले. आपल्या विरोधात 22 मते गेली. 99.9 टक्के मतदान शेकापला झाले आहे. आपण आणखी मते आणू शकलो असतो, असा विश्वासही आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस नेते स्व. माणिकराव जगताप हे आपले चांगले मित्र, चांगले सहकारी होते. त्यांनी आपल्याला सहकारासह विविध क्षेत्रात सहकार्य केले. आज त्यांचे बंधु हनुमंत जगताप यांना बँकेवर बिनविरोध निवडून आणले आहे. हनुमंत जगताप बँकेवर संचालक म्हणून निवडून आले आहेत, त्याचा आनंद आहे. त्यामुळे माणिकराव जगताप यांच्यासाठी काही तरी केल्याचे समाधान आहे, गेली 30 वर्षापासून सहकार चळवळीत काम करीत आहे. बँकेचे कामकाज आधुनिक करून कमी कालावधीत बँकेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकेची उलाढाल 35 कोटीवरून पाच हजार कोटीपर्यंत नेली आहे. जिल्हा बँकेप्रमाणे प्राथमिक संस्थांचे कामकाजदेखील अद्ययावत झाले पाहिजे या भूमिकेतून काम केले जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नवीन चेहर्यांना संधी दिली आहे. सुरुवातीला अनेक विरोध झाले. मात्र त्या विरोधाला मात करीत शेकापने घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्यावर ठेवलेला विश्वास हाच आपला विजय आहे. आजचा हा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. चांगल्या मतांनी विजय मिळाला आहे. माणिक जगताप यांचे बँकेच्या जडणघडणीत चांगले योगदान राहिले आहे. त्यांची आठवण म्हणून त्यांचे बंधू हनुमान जगताप यांना बिनविरोध निवडून दिल्याचा आनंद आहे. अर्ज भरताना महाविकास आघाडी म्हणून भरला होता. आता मात्र महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे हा विजय इंडिया आघाडीचा आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे या निवडणूक रिंगणात होते. आमदार जयंत पाटील 99 पैकी 94 मते मिळवून विजयी झाले. एकूण 99 मतांपैकी विद्यमान अध्यक्ष आ. जयंत पाटील यांना अलिबागमधून 68 पैकी 68, पेणमधून 10 पैकी 5, माणगावमधून 8 पैकी 8 आणि खालापूरमधून 13 पैकी 13 अशी 94 मते पडली तर विरोधी उमेदवार संतोष तुकाराम देशमुख यांना पेणमधून फक्त 5 मते मिळाल्याने आ. जयंत पाटील हे भरघोस मतांनी विजयी झाले. शेकापच्या अन्य दोन विजयी उमेदवारांपैकी प्रिता प्रवीण चाैलकर यांना एकूण 1441 मतांपैकी अलिबागमधून 904 पैकी 452, पेणमधून 146 पैकी 58, माणगावमधून 179 पैकी 90 आणि खालापूरमधून 212 पैकी 104 अशी 704 मते मिळाली तर मधुरा महेश मलुष्टे यांना अलिबागमधून 904 पैकी 451, पेणमधून 146 पैकी 54, माणगावमधून 179 पैकी 89, खालापूरमधून 212 पैकी 105 अशी 699 मते मिळाली. तर विरोधी उमेदवार संगिता राजू देशमुख यांना अलिबागमधून 1, पेणमधून 18, माणगावमधून 0, खालापूरमधून 2 अशी एकूण 21 मते तर मनिषा चंद्रकांत पाठारे यांना अलिबागमधून 0, पेणमधून 16, माणगावमधून 0, खालापूरमधून 1 अशी 17 मते मिळाली. अलिबागमधील एक मत अवैध ठरले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 21 ही संचालक पदांवर विजय संपादन करून शेकापने पुन्हा एकदा लालबावटा फडकाविला आहे. बिनविरोध झालेल्या संचालकांमध्ये प्रशांत नाईक – अलिबाग, नृपाल पाटील – अलिबाग, सुरेश खैरे – सुधागड, महेश म्हात्रे – उरण, संतोष पाटील – पनवेल, तानाजी मते – कर्जत, प्रवीण लाले – खालापूर, पी.डी. पाटील – पेण, विजय गिदी – मुरुड, अजित कासार – मुरुड, गणेश मढवी – रोहा, ज्ञानेश्वर भोईर – तळा, अस्लम राऊत – माणगाव, वसंत यादव – श्रीवर्धन, संतोष पाटील – म्हसळा, हनुमंत जगताप – महाड, एकनाथ गायकवाड – पोलादपूर, किसन उमटे – सुधागड यांचा समावेश आहे.
हुकूमशाहीची राजवट नष्ट करायची आहे
देशात राजकीय वातावरण बिघडू चालले आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. देशात इंडिया आघाडीच्यामार्फत सर्व पक्ष एकत्र आलो आहेत. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला स्थान दिले आहे. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. देशात सुरु असलेली हुकूमशाहीची राजवट नष्ट करून संविधान आपल्याला वाचवायचे आहे असे आ. जयंत पाटील म्हणाले.
अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा
जिल्हाभरात अतिक्रमण विरोधी कारवाई राज्यकर्त्यांनी जोरात सुरु केली आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या कारवाईने अनेक जण बेघर होऊ लागले आहेत. ही दडपशाही कधीच शेकाप सहन करणार नाही.ही कारवाई थांबवा असा सज्ज इशारा आ. जयंत पाटील यांनी देत जिल्ह्यातील नागरिकांच्या पाठीशी शेकाप कायमच आहे अशी ग्वाही दिली.
विरोधकांना चारली धुळ
इतर शेती सहकारी संस्था मतदार संघाच्या एक जागेसाठी शेकापचे आ. जयंत पाटील यांच्या विरोधात संतोष देशमुख उभे राहिले होते. आ. जयंत पाटील यांनी 99 पैकी 94 मते मिळवून भरघोस मतांनी विजय मिळविला. विरोधकाला दोन अंकीदेखील आकडा पार करता आला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे फक्त पाच मते मिळवून समाधान व्यक्त करावे लागले. तसेच महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांच्या निवडणूकीत शेकापच्या मधुरा मलुष्टे यांना 699 व प्रिता चौलकर यांना 704 मते मिळाली. विरोधकांना धुळ चारून त्यांचा दारुण पराभव केला.
शुभेच्छांचा वर्षाव
मतदान केंद्रामध्ये सकाळी दहानंतर विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.काहींनी प्रत्यक्षात भेटून तर काहींनी सोशल मिडीयामार्फत अभिनंदन करीत आ.जयंत पाटील यांच्यासह सर्वच संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व विजयी उमेदवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
