अनंत नारंगीकर
उरण : यावर्षी मंगळवार दि१९ सप्टेंबर रोजी सर्वत्र गौरी – गणपतीचे आगमन होणार असल्याने नवचैतन्य, उत्साह आहे. या उत्सवात गरिबांनाही सहभागी होता यावे, यासाठी रेशन कार्डधारकांना शासनाकडून आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गोदामातून आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचला आहे.मात्र उरण तालुक्यातील रेशन दुकानात गणेशोत्सवाला दोन दिवस शिल्लक असताना ही आनंदाचा शिधा पोहचला नाही.त्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये सध्या नैराश्याची भावना पसरली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०२३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व एक लीटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.सदर आनंदाचा शिधा हा दि १ सप्टेंबर पासून सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल.असे आदेश शासनाने जारी केले आहेत.
त्या अनुषंगाने राज्यातील काही भागात गणेशोत्सवापूर्वी आनंदाचा शिधा पोहचला ही आहे.मात्र उरण तालुक्यातील गोदामात आलेला आनंदाचा शिधा ( साखर, पामतेल,डाळ,रवा ) हा तालुक्यातील रेशन दुकानात गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ही पोहचला नाही.त्यामुळे गोरं गरीब शिधापत्रिका धारकांमध्ये नैराश्याची भावना पसरली आहे.अशी प्रतिक्रिया सध्या जनमाणसात वर्तविण्यात येत आहे.तरी राज्य शासनाने गणेशोत्सवात आनंदाचा शिधा गोरं गरीब शिधापत्रिका धारकांना कशा प्रकारे लवकरात लवकर वितरण करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आदिवासी शिधापत्रिका धारकांकडून करण्यात येत आहे.
