• जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांचे आवाहन
• फोर्टिफाइड तांदुळाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये -तहसीलदार महेंद्र वाकलेकर
अभय पाटील
बोर्ली पंचतन : संपूर्ण राज्यात फोर्टीफाईड तांदुळ वितरणाची सुरवात झालेली आहे. फोर्टीफाईड तांदुळ हा सकृत दर्शनी तांदळात भेसळ असल्यासारखा वाटू शकतो. हा तांदुळ पाण्यावर तरंगु शकतो. परंतु हा सामान्य तांदळासारखाच आहे. तो सामान्य तांदळाप्रमाणे सेवनासाठी वापरला जातो. लाभार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा तांदुळ पोषक असल्याने शासनाने सदर तांदळाचे वितरण रेशनव्यवस्थेमार्फत सुरु केले आहे. त्यामुळे हा प्लास्टिक तांदूळ नव्हे, तर पौष्टिक ‘फोर्टीफाईड तांदूळ’ आहे. फोर्टीफाईड तांदळाबाबत काही शंका, अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रभारी पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे.
केंद्र शासनाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनी देशातील गरीब जनतेस पौष्टीक धान्य उपलब्ध करुन देण्याबाबत घोषणा केली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व राज्यात केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनव्यवस्थेमार्फत फोर्टिफाइड अर्थात पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदुळ वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. फोर्टीफाईड तांदुळ वितरण योजना ही मा.पंतप्रधानांची महत्वाची योजना आहे.
केंद्र शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शिधापत्रीका धारकांना फोर्टीफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणा-या तांदूळामध्ये फोर्टीफाईड तांदूळ व नियमीत तांदूळ यांचे प्रमाण १:१०० आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात येणा-या तांदूळामध्ये फोर्टीफाईड प्रमाण १ किलो मध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे. त्यामुळे योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदार्शनास आल्यास गैरसमज करण्यात येउ नये. फोर्टीफाईड तांदूळ नियमित पध्दतीने शिजवण्यात यावा या करीता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबविण्याची आवश्यकता नाही, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
| फोर्टिफाईड तांदूळ हे प्लॅस्टिकसदृश्य भासतात. त्यामुळे या तांदूळांबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. प्रक्रीया करण्यात आलेल्या फोर्टीफाईड तांदूळाचे वजन हे नियमीत तांदूळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. मात्र सामान्य तांदळापेक्षा फोर्टिफाईड तांदूळ हे अधिक पोषक ठरतात. अनेकांना फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे नेमके काय माहीत नाही. फोर्टिफाईड तांदूळ अशा प्रकारचे तांदूळ असतात जे अतिरिक्त पोषक तत्वांनी समृद्ध करण्यात येतात, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी मदत मिळते. |
| फोर्टिफाइड’ तांदूळ लोह आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिड, लोह आणि झिंक या सर्व पोषक घटकांचे मिश्रण ह्या भातामध्ये आहे. लोकांच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्याबरोबरच कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा तांदूळ उपयुक्त ठरत आहे. यामध्ये आयर्न, फॉलिक अॅसीड, व्हिटॅमीन ए, बी१, बी२, बी५, बी६, बी१२, झिंक या पोषक घटकांचा समावेश करुन फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आला आहे. त्यामुळे अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. |
फोर्टिफाइड तांदुळात १२ प्रकारचे पोषण तत्व असतात. अशी पोषक तत्वे असलेला तांदूळ लोकांनी खावा. ह्या प्रकारचा तांदुळ प्रयोगशाळेत तपासणी केलेला असुन ट्रस्टेड आहे. या तांदुळापासून आरोग्याला कोणताही धोका नाही. फोर्टिफाइड तांदूळाबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर याबाबत कोणत्याही अफवा पसरवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. फोर्टिफाइड तांदूळाबाबत कोणतीही शंका असल्यास माहिती घेण्यासाठी श्रीवर्धन महसूल विभागात किंवा पुरवठा विभागात संपर्क साधावा.
–महेंद्र वाकलेकर,
तहसीलदार श्रीवर्धन
