घनःश्याम कडू
उरण : गेली अनेक वर्षांपासून जासई येथील उड्डाण पुलाचे काम सुरू होते. अखेर अभियंता दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी सायंकाळी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी जासई उड्डाणपूल सुरू झाल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
जेएनपीटी व इतर बंदरातून मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दास्तान फाटा-जासई ते गव्हाण फाटापर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत होती. यामुळे प्रवाशांबरोबर वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी जासई येथे उड्डाणपुलाची उभारणी सुरू होती. वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान 1200 मीटर लांबीचा आणि सुमारे 100 कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपूलाचे काम मागील आठ वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे.
एकीकडचा मार्ग पूर्ण झाल्याने व दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवा निमित्ताने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. त्यामुळे शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधत सायंकाळी 4 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लवकरच दुसरा मार्ग ही वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने प्रवाशी वर्गाबरोबर वाहन चालकांनी समाधान व्यक्त केला. यामूळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, त्याचबरोबर वेळेचीही बचत होणार असल्याचे प्रवाशी वर्ग सांगतात.
