अनंत नारंगीकर
उरण : गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे. उरण, मोरा-सागरी आणि न्हावा-शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ८,४२६ आणि सार्वजनिक १८ अशा एकूण ८,४४४ श्री गणेशाच्या मूर्तीची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली आहे. यावेळी अनेक गणेशभक्तांनी आपआपल्या घरी चांद्रयानाचा देखावा साकारला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.





यावर्षी मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव येत असल्याने गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. उरण तालुक्यातील उरण, मोरा-सागरी आणि न्हावा-शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ८,४२६ आणि सार्वजनिक १८ अशा एकूण ८,४४४ श्री गणेशाच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारचे विघ्न गणेशोत्सवात भाविकांना पहिल्याच दिवशी सहन करावा लागल्याने भाविकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने गणेशोत्सवाचे औचित्य साधून अनेक भक्तांनी चिरनेर गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून मंदिरात गर्दी केली होती. मात्र, यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना वाढत्या महागाईचा तसेच चिटफंड घोटाळ्यात अडकून पडलेल्या पैशाचा त्रास सहन करावा लागला आहे.
