क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट पॅनल क्रिकेट पंच परीक्षेचे निकाल समोर आले असून रायगड जिल्ह्याचे ॲड. पंकज सुभाष पंडित (पोयनाड-अलिबाग) आणि सुयोग सुधाकर चौधरी (पनवेल) असे दोन पंच यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै व ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन प्रकारे घेण्यात आली होती. ह्यामध्ये लेखी परीक्षा १०० गुणांची तर प्रात्याक्षिक परीक्षेसाठी १०० गुण होते. एकूण अर्जदारांपैकी लेखी परीक्षेला १९७ उमेदवार बसले होते. त्यापैकी ८० जणांची निवड प्रात्याक्षिक परीक्षेसाठी करण्यात आली होती. अंतिम निकाल एमसीएतर्फे घोषित करण्यात आला. एकूण परीक्षेत ८०% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची कट ऑफ लिस्ट लावण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पंच उत्तीर्ण झाले त्यात रायगड जिल्ह्याचे ॲड. पंकज पंडित आणि सुयोग चौधरी यांना ८०℅ पेक्षा जास्त गुण प्राप्त करून यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. ॲड. पंकज पंडित हे गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यासाठी क्रिकेट पंच म्हणून योगदान देत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाच श्रेय सुप्रसिद्ध क्रिकेट कोच व क्रिकेट लाॅ एक्स्पर्ट नयन कट्टा (उरण) यांच्या मार्गदर्शनाला दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जिल्हा क्रिकेट असोसिएशनने करून घ्यावा अशी अपेक्षा ॲड. पंडित यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली.
तर दुसरे पंच सुयोग चौधरी हे बीसीसीआयचे अँटी करप्शन मॅनेजर इन क्रिकेट म्हणून योगदान देत आहेत. दोन्ही पंचांना क्रिकेट मैदानावर ज्येष्ठ पंच चंद्रकांत म्हात्रे, इजाज मारुफ, राजीव योगी, विवेकानंद तांडेल, शंकर दळवी यांनी मार्गदर्शन केले आहे. दोन्ही पंचांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, रायगड प्रीमियर लीग, झुंझार युवक मंडळ पोयनाडसह जिल्ह्यातील विविध क्रिकेट क्लब, असोसिएशन, अकॅडमीचे पदाधिकारी, सदस्य, खेळाडू व क्रिकेट प्रेमींनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
