पुढच्या वर्षी लवकर या…गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप
सलीम शेख
माणगाव : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या …मंगलमूर्ती मोरया…गजरात माणगावसह तालुक्यातील २ सार्वजनिक, ५४५१ खाजगी घरगुती गणपतींचे तसेच १२९८ गौरींचे काळ व गोद नदीच्या पात्रातून तसेच तलावातून उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विसर्जन दिवशी दुपारपासूनच पावसाची संततधार माणगाव तालुक्यात सुरू होती. दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विसर्जन तालुक्यात सुरू होते. काही गणेश भक्तांनी गाडीतून गणराय विसर्जनासाठी आणले. माणगाव येथील काळ नदी ठिकाणच्या गणपती विसर्जन घाटाजवळ नगरपंचायतीचे कामगार गणरायाचे विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच साळुंके रेस्क्यू टीम यावेळी काळनदी पात्रात तैनात ठेवण्यात आली होती.

नगरपंचायतीतर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले. विसर्जन ठिकाणी माणगाव नागरपंचायतीतर्फे गणेश भक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत कृत्रिम विसर्जन तलावाचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करा, माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य येथे टाकावे. असा संदेश नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संतोष माळी व कर्मचारी वृंद यांच्यातर्फे देण्यात आला होता. माणगाव नगरपंचायतीतर्फे गणेश विसर्जनाची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत उत्साही वातावरणात व शांततेत माणगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
