घन:श्याम कडू
उरण : तालुक्यात शिवसेनेचा (उध्दव ठाकरे गट) ढाण्या वाघ अशी ओळख असणारे माजी सरपंच जे. पी. म्हात्रे (६०) यांचे शुक्रवारी (२३) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर नवीन शेवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
१९८७ साली शाखा स्थापन झाल्यावर शाखाप्रमुख पदी ते कार्यरत होते. त्यांनी मागील २० वर्ष नवीन शेवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा तर ५ वर्षे सदस्य पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. तसेच त्यांनी तालुका संपर्कप्रमुख पदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. सतत २० वर्षे सरपंच असतानाही त्यांना कशाचा गर्व वाटत नव्हता. ते सर्वांशी हसतखेळत आपले काम करीत आले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत ते शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्यासमोर कोणीही शिवसेनेवर अथवा नेत्यांवर टीका केली तर त्यांना लगेच ठणकावून जाब विचारीत असत. गेली २० वर्षे सरपंच राहूनही ते साधे जीवनमान जगत होते. आता तर सरपंच झालेले मालामाल झाले असल्याचे दिसते. पक्ष वाढीसाठी ते जीवाचे रान करीत असत.
अंत्यसंस्कार प्रसंगी माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी , शिवसैनिक, ग्रामस्थ, नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
