• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

८२ वर्षाची रुढी परंपरा यांचे जतन करणारे खोपटा गावातील गौरा उत्सव बनले भाविकांचे श्रध्दास्थान

ByEditor

Sep 23, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
रुढी परंपरा यांचे जतन करण्यासाठी खोपटा गावातील शिव मंदिरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने गौरा ( शंकर, पार्वती आणि श्री गणेश ) मुर्तीची प्रतिष्ठापना गौरा मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. २२) करण्यात आली आहे. गौरा उत्सव ८२ वर्षात पदार्पण करत असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, ग्रामस्थांनी सामाजिक भावनेतून खोपटा गावात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.

स्वातंत्र्य काळात रहिवाशांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी १९४१ साली खोपटा पाटील पाडा येथील रामजी तुकाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थ मंडळाची स्थापना करुन गौरा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.आज ही या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य हे आपल्या आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खोपटा गावात गौरा म्हणजे शंकर,पार्वती आणि गणपती याची एकत्रित शिवगौऱ्याच्या मूर्तीची प्रतिस्थापना मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा, धार्मिक विधी करुन करत आहेत.पाच दिवस साजरा होणाऱ्या उत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.

गौरा उत्सवाच्या पहिल्या दिवशी मात्र महिलावर्गाला दर्शन दिले जात नाही. त्याचे कारण म्हणजे शिव शंकराला त्या दिवशी बांगडीच्या आवाजाने नृत्यामध्ये भंग होऊ नये म्हणून महिला वर्ग पहिल्या दिवशी दर्शनास जात नाहीत आणि त्या परंपरेचं जतन महिला भगिनी आजही करत आहेत. रात्री १२ वाजता शिव गौरा एका पुरुषाच्या अंगात येत असल्याने हा महिमा बघण्यासाठी उरण परिसरातील तरुण वर्गानी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती .

शिव मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या शिव गौऱ्या च्या मूर्ती सोबत पेंटर भालचंद्र दत्तात्रेय म्हात्रे यांनी सुंदर देखावा सादर केला आहे.गौरा उत्सवाचे औचित्य साधून मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरातील शिवलिंग व गौराच दर्शन व गोरा कुंभार या चल चित्राचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.बाल्या नाच,सह धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय यावर्षी ही उत्सव मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील व सत्यवान भगत यांनी दिली आहे .

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!