• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजपकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर, लोकशाही धोक्यात: ॲड. सुनील सानप

ByEditor

Sep 28, 2026

रोह्यात काँग्रेस बैठकीत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

धाटाव । शशिकांत मोरे
“२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर अपप्रचार करून आणि खोट्या आश्वासनांच्या बळावर भाजपने सत्ता हस्तगत केली. १५ लाख रुपये, रोजगार, कर्जमाफी आणि महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली. सत्तेवर आल्यानंतर ईडी, निवडणूक आयोग यांसारख्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत भाजपने मनमानी कारभार सुरू केला आहे,” असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. सुनील सानप यांनी केला.

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या निर्देशानुसार रोहा येथील हॉटेल मिराज येथे रविवारी सायंकाळी रोहा तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ॲड. सानप यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. “ईव्हीएम आणि केंद्रीय यंत्रणांच्या जिवावर सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयत्न लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून, देशाला आता काँग्रेसशिवाय पर्याय उरलेला नाही,” असेही ते म्हणाले.

पक्षनिष्ठा आणि शिस्त पाळा: मितेश कल्याणी

तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी यांनी बैठकीच्या अध्यक्षतेवरून बोलताना सांगितले की, “सर्व कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा आणि शिस्त पाळून घटनेच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे.” जनता आता भाजपच्या कारभाराला कंटाळली असून आगामी काळात काँग्रेसला अच्छे दिन येतील, असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष अशफाक पानसरे यांनी व्यक्त केला. तर जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख यांनी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होईल असे सांगितले.

ज्येष्ठ नेते बशीर भुरे यांनी राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले, तर अकिल लांबते यांनी शहरातील वाढीव नळपट्टी व स्मार्ट मीटरविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी केली.

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड व सत्कार

या बैठकीत रोहा तालुका व शहर पातळीवरील विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली:

  • अनुसूचित जाती-जमाती सेल (तालुकाध्यक्ष): देविदास जाधव
  • ओबीसी विभाग (तालुकाध्यक्ष): भरत कोतवाल
  • अल्पसंख्याक सेल (तालुकाध्यक्ष): बिलाल कुरेशी
  • अल्पसंख्याक सेल (कार्याध्यक्ष): फैसल अधिकारी
  • सोशल मीडिया सेल (तालुकाध्यक्ष): आदिल पानसरे
  • सोशल मीडिया सेल (कार्याध्यक्ष): विनोद सावंत
  • नागोठणे शहर अध्यक्ष: तसव्वूर अ. वाहब अधिकारी

या बैठकीस जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाश कुशवाहा, सरचिटणीस सुनील देशमुख, बशीर भुरे, सद्दाम दफेदार, माजी नगरसेवक अहमद खांबरे, शब्बीर नाडकर, विलास टेमकर, असिफ मुल्ला, अकिल लांबते, अशोक कांबळे, नजीर सय्यद, महेश देशमुख यांच्यासह बहुसंख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!