• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चाकरमान्यांना वाहतूक कोंडीशी करावा लागला सामना !

ByEditor

Sep 25, 2023

मुंबई–गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे ५ कि.मी वाहनाच्या रांगा

सलीम शेख
माणगाव :
कोकणवासियांचे आराध्य दैवत गौरी गणपतीला नुकताच भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात मुंबई गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान ५ कीमी अंतरावर वाहतूकीच्या कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी तासनतास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे त्यांची महामार्गावर चांगलीच रखडपट्टी झाली असून या मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस, रायगड पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणात तैनात करण्यात आले असले तरीही वाहतूक कोंडी सोडवताना चांगलीच दमछाक झाली असून पोलिसांची या वाहतूक कोंडीमुळे झोपच उडाली आहे.

रायगड पोलिसांनी गणेश उत्सवाच्या काळात माणागावात दरवर्षी होणारी वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग काढून तसेच माणगावात दुभाजक बसवून रंगीत तालीम केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षीही गणेशोत्सवासाठी कोकण व तळ कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा उत्साह पाहून माणगावात वाहतूक कोंडी होईल असा अंदाज बांधला जात होता. त्याप्रमाणे माणगाव नगरपंचायत व पोलीस यांनी नियोजन करून १९ सप्टेंबर गणेशचतुर्थी पूर्वी ८ दिवस अगोदर रस्त्यावरील अडथळे, अनधिकृत पार्किंग, फेरीवाले व हातगाडीवाले यांना हटवून योग्य त्या सुचना दिल्या होत्या मात्र ५ दिवसांचे गौरी गणपती विसर्जनानंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच तळ कोकणातून मुंबई, ठाणे, सुरतकडे परतणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांचा महापूर लोटल्याने अखेर वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. माणगासह लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांची मुंबई – गोवा महामार्गावर चांगलीच रखडपट्टी झाली. तासंतास प्रवाशांना रस्त्यावरच अडकून पडावे लागले. रायगड पोलिसांनी इंदापूर, माणगाव, लोणेरे येथे वाहतूक पोलिस तसेच पोलिस होमगार्ड तसेच दंगलकाबू नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर अतिरिक्तही पोलिस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असले तरी इंदापूर माणगाव, लोणेरे भागात अखेर वाहतूक कोंडीचे विघ्न गणेष भक्तांच्या आड आलेच.

मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रायगड पोलिसांनी अनेक पर्यायी मार्ग केले होते. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना महाड येथील पाचाड मार्गे बोरवाडी निजामपूर मार्गे सोडण्यात आले. तर लोणेरे, गोरेगाव, मोर्बा मार्गे पर्यायी मार्गाने पाठविण्यात आले. सकाळपासूनच इंदापूर, माणगाव, लोणेरे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे आपल्या नियोजित कामावर अनेक प्रवाशांना वेळेवर पोहोचता आले नाही. माणगाव बाजारपेठेतील वाहतूकीची कोंडी दरवर्षी गणेशभक्तांना नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. वाहतूकीच्या कोंडीचे कोडे कधी सुटणार ? हा प्रश्नच वर्षानोवर्ष अनुत्तरीत राहिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!