संस्थेच्या ठेवी ५० कोटीपर्यंत वाढविणार -किशोर जैन
श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
किरण लाड
नागोठणे : सभासद होण्यासाठी आमच्या पतसंस्थेनी कोणतीही फूटपट्टी लावली नाही. पतसंस्थेचे सभासद नागोठणे तसेच पंचक्रोशीतील आहेत असे उदगार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढले. आराधना हाॅल, जैन मंदिर नागोठणे येथे आयोजित केलेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किशोर जैन बोलत होते.

ते पुढे असेही म्हणाले कि, पतसंस्थेच्या ठेवी 50 कोटीपर्यंत नेण्याचा आमंचा मानस असून घर बांधण्यासाठी 10 लाखापर्यंत कर्ज देणार आहोत. त्याचा फायदा सर्वसामान्यांना आपला हक्काचा निवारा बांधण्यासाठी होणार आहे. पतसंस्थेला ऑडीटचा ‘अ ‘ वर्ग मिळाला आहे. आगामी काळात इतर तालुक्यातील दोन पतसंस्था टेक ओव्हर’ करणार असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले. संस्थेची वाढ नैसर्गिक असून ठेवीसाठी आम्ही समाजात जात नाही, किंवा मागत नाही तरीही आमच्या पतसंस्थेच्या ठेवी वाढल्या आहेत. आमच्यावर तसेच संस्थेवर ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे असेही शेवटी जैन म्हणाले.





संस्थेचा सन 2023 व 2024 सालचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक संस्थेचे सचिव संजय काकडे यांनी वाचून दाखविला तर अंदाजपत्रकाचे वाचन संस्थेच्या खजिनदार दिपीका गायकवाड केले. मागील वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले यांनी वाचून दाखविले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, उर्दू हायस्कूल, भारतीय एज्युकेशन सोसायटी अशा शाळांमधील दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत, यशस्वी मुलांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रिर्यदर्शनी चालक मालकचे अध्यक्ष सिराज पानसरे, उपाध्यक्ष प्रथमेश काळे व संचालक मंडळ तसेच नागोठणे मराठाआळीतील 10 वर्षाचा प्रसिध्द बासरीवादक मास्टर मेघ पोटे याच्या सत्काराबरोबर नागोठण्यातील इतर विशेष मान्यवर व्यक्तींचा सत्कारही पतसंस्थेतर्फे करण्यात आला.

श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर जैन, सचिव संजय काकडे, खजिनदार दिपीका गायकवाड, संचालक सुरेश कामथे, रितेश दोशी, शैलेश रावकर, राजकुमार जैन, मोहन नागोठणेकर, संचालिका विजया जैन, सुप्रिया महाडिक, कल्पना टेमकर तसेच रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय भोसले, शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटीका दर्शना जवके व पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेस कर्मचारी वर्ग, पिग्मी कर्मचारी, सभासद तसेच नागोठण्यातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभारप्रदर्शन होऊन श्री जोगेश्वरी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार

नागोठण्यातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय देण्याचे काम आपल्या पत्रकारितेमार्फत करणारे पत्रकार किरण लाड यांची ‘रायगड जनोदय’च्या उपसंपादक पदी नेमणूक झाल्याबद्दल किरण लाड यांचा सत्कार श्री जोगेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आला.
