घनःश्याम कडू
उरण : फुंडे गावाजवळील पूल कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजतागायत पूल उभारण्यात आलेला नाही. मात्र माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भराव करून रस्ता बनविला होता. परंतु पावसाळ्यात पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयातून जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. तरी त्वरित हा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूल कोसळून एका तरुणाचा बळी गेला होता. त्यानंतर सदर पूल करण्यास सिडकोकडून कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. फुंडे, डोंगरी व पाणजे गावांना जोडणारा हा रस्ता होता. त्यामुळे उलट फेरा मारून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत होता. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी तात्पुरता भराव करून रस्ता बनविल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे शक्य झाले. परंतु, पावसाळ्यात या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे रस्ता आहे की नाही असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. या खड्डेमय रस्त्यावरून विशेषतः शाळकरी मुलांनाही जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. तरी त्वरित या रस्त्यावर पुन्हा सिडकोने पूल उभारून येथील ग्रामस्थांचा प्रवास सुखकर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.