वैभव कळस
म्हसळा : तालुक्यातील रेवळी गावचे सुपुत्र तुकाराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत नियुक्तीचे पत्र भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिले आहे. यापूर्वीचे तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांना जिल्हा चिटणीसपदी बढती देण्यात आली आहे.
भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील यांनी यापूर्वी तालुका चिटणीस म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. यापूर्वी भाजप पक्ष संघटनेतही त्यांनी संपर्काचे चांगले काम केले आहे. या एकूणच संघटन बांधणीच्या दांडग्या अनुभवाचा फायदा तालुका भाजप संघटनेला होईल, असे नियुक्तीनंतर बोलताना माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल यांनी सांगितले. नियुक्तीनंतर तुकाराम पाटील म्हणाले की, म्हसळा तालुक्यात गावोगावी संपर्क करून संघटनात्मक बांधणी केली जाईल. त्याचबरोबर पक्षाने दिलेल्या तालुका अध्यक्षपदाच्या संधीचे प्रामाणिकपणे काम करून तालुक्यात भाजपला पुढील काळात चांगली दिशा देण्याचे काम सर्वांनाबरोबर घेऊन माझ्याकडून होईल असे आश्वासन त्यांनी दिले.
