राजकिय बिगुल वाजल्याने निवडणूक आखाड्यांना सुरुवात?
वैभव कळस
म्हसळा : ३९ ग्रामपंचायती आणि १ नगरपंचायत असलेल्या म्हसळा तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीपुर्वी १२ ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशाने आयोग प्रमुख के. सूर्यकृष्णमुर्ती यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यानुसार म्हसळा तालुक्यात १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहेत.
म्हसळा तालुक्यात संपन्न होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत वारळ, ठाकरोली, कुडगाव, घूम, आडी महाड खाडी, नेवरुळ, भेकऱ्याचा कोंड, वरवठ्णे, पांगलोली, साळविंडे, कोलवट,जांभुळ या १२ ग्राम पंचायतीचा सामावेश आहे.दिवाळीचे फटाके फुटण्यापूर्वीच राजकिय पक्ष ग्राम पंचायत निवडणूकीचे फटाके फुटणार असल्याने राजकिय आखाड्यांना सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पक्षीय सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. वरील १२ ग्रामपंचायतीमध्ये मागील पाच वर्षांपासून ७ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच तर ५ ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सरपंच नेतृत्व करत होते. नव्याने राज्यात मोठ्या प्रमाणात राजकिय स्थित्यंतर घडून आले आहे. सेनेत दोन गट पडले असल्याने त्याचा राजकिय फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असले तरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ असल्याने विकासाचे राजकारण करत बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
थेट सरपंच पदासाठी निघालेल्या आरक्षणाप्रमाणे १२ पैकी ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद महीलांसाठी राखीव आहेत. ५ पैकी ३ सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आणि २ नागरिकांचा मागास प्रवर्गातील राखीव आहेत. ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण पहाता वारळ ग्राम पंचायत- सर्वसाधरण स्त्री, ठाकरोली – सर्वसाधारण स्त्री, कुडगाव – ना.म.प्र., घूम – ना.म.प्र. स्त्री, आडी महाड खाडी – सर्व साधारण स्त्री, नेवरुळ – सर्वसाधारण स्त्री, भेकऱ्याचा कोंड – सर्वसाधारण, वरवठ्णे – सर्वसधारण, पांगलोली – नामप्र स्त्री, साळविंडे – नामाप्र, कोलवट – अनु.जाती. स्त्री, जांभुळ – सर्वसाधारण अशा पध्दतीने असणार आहे. सोमवार, दि. १६/१०/२३ ते शुक्रवार दि. २०/१०/२०२३ नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटचा दिवस असून उमेदवारी मागे घेण्याचे २५/१०/२३ पर्यंत किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत याचे काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
