• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रसोल कंपनी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कंपनी निरीक्षकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

ByEditor

Oct 5, 2023

मिलिंद माने
महाड :
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये प्रसोल कंपनीमध्ये विषारी वायू गळती होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला व तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून या प्रकाराला कंपनी निरीक्षक जबाबदार असल्याने त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला लेखी निवेदन देऊन केली आहे.

महाड एमआयडीसीमध्ये वारंवार असे प्रकार घडतात व या प्रकाराला कंपनीतील कामगार बळी पडतात. असाच प्रकार महाड एमआयडीसी मधील प्रसोल या कंपनीत झाला. महाड एमआयडीसीमधील आमशेत गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या प्रसोल कंपनीमध्ये सकाळी वायू गळती होऊन अशोक सिंग नावाचा पश्चिम बंगालमधील कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर या कंपनीत काम करणारा संतोष मोरे हा नाते गावचा रहिवासी असून तो गंभीररित्या जखमी झाला असल्याने व त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. त्याखेरीज अन्य तीन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

आमशेत गावच्या हद्दीत असणाऱ्या प्रसोल कंपनीमध्ये वायू गळती होण्याची आता ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे आधीच भीतीग्रस्त असणाऱ्या आमशेत, गावडी, बारसगाव ,पडवी, या गावातील ग्रामस्थांना या वायुगळतीचा वारंवार सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम गावात राहणाऱ्या लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक व महिला वर्गांला मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापन याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या गावातील लोकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. यामुळे या गावातील नागरिकांनी अशी वायु प्रदूषण करणारी कंपनी तातडीने बंद करण्याची मागणी देखील वारंवार प्रशासनाकडे केली आहे. मात्र, मुजोर प्रशासन कंपनी व्यवस्थापनाशी हात मिळवणी करीत असल्याने आज सकाळी वायू गळतीचा हा तिसरा प्रकार घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

महाड एमआयडीसीमधील प्रसोल कंपनी व्यवस्थापना विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज कंपनीमध्ये जाऊन कंपनी व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारला. यामध्ये धनंजय देशमुख, दक्षिण रायगड उप जिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे, शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे, श्रीकांत ननावरे व निलेश धुमाळ यांनी कंपनी व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन प्रसोल कंपनीमध्ये आज झालेल्या वायू गळतीला व या घटनेमध्ये जबाबदार असणाऱ्या कंपनी निरीक्षकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करून या सर्व प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत कंपनी बंद करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!