शशिकांत मोरे
धाटाव : रायगड जिल्ह्यात थरकाप उडालेल्या कोलाड येथील रेल्वे फाटकावरील गेटमनची हत्या प्रकरण ताजे असतानाच रोहा शहरालगतच्या धामणसई आदिवासी वाडीवरील वृद्ध महिलेच्या हत्येने रोहा तालुका पुन्हा हादरला. धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०) या वृद्ध महिलेची बुधवारी निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. झोपडीपासून ५० मीटर अंतरावरील जंगल पायवाटेवर महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेला खाली पाडून, तोंड जमिनीत दाबून ठार मारले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिलेच्या डोक्यावर दगड ठेवलेला आढळून आल्याने खुनाचा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
रोहा शहरा लगतच्या धामणसई आदिवासी वाडीतील लक्ष्मी वाघमारे ह्या महिलेची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. महिलेच्या खुनाबाबत रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या हत्येची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली. खुनाच्या तपासासाठी ५ तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. तपासाचा वेग वाढवला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. आम्ही लवकरच खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरू अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. दरम्यान, महिलेच्या खुनाच्या तपासात नेमके काय समोर येते, कोणत्या कारणासाठी वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली, हे समोर येणार आहे तर कोलाड रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याच्या खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरलेले रायगड पोलीस प्रशासन ह्या गुन्ह्याचा तपास तातडीने लावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
