महेंद्र म्हात्रे
नागोठणे : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतरही खारेपाट विभागाला ना नियमित पाणी, ना रस्ते, ना पुल, ना नियमित लाईट, ना साकव…आजवर अनेक वेळा आंदोलन उभारून, मोर्चे काढून देखील खारेपाट विभागाकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याची खंत खरिपात विभागातील समाजसेवक सी. आर. म्हात्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
आपले परखड मत व्यक्त करताना सी. आर. म्हात्रे यांनी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. आज मुंबई सभोवलाचा परिसर विकसित होत आहे. नवी मुंबई विमानतळ, अलिबाग विरार कॉरिडॉर, कोकण एक्स्प्रेस ड्रीम प्रोजेक्ट याचे भूसंपादन, गेल पाइप लाईनसाठी भूसंपादन, खारबंदिस्तीची दुरवस्था, सेझचे भूत अशा एक ना अनेक समस्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या विभागात अनेक संघटना आहेत पण कोणत्याही संघटनेला यश मिळत नाही. याचे एकमेव कारण म्हणचे या संघटनेत राजकीय नेत्यांचा हळूच प्रवेश होतो आणि त्यांची श्रेयाची लढाई सुरू होते. यामुळे संघटनेत काम करणाऱ्या मंडळींचा निरस होतो आणि आपोआपच या राजकीय नेत्यांचे उद्दिष्ट्य साध्य होते. शासनाच्या विविध खाजगीकरणाच्या बातम्यांनी तर तरुणाईत संभ्रम निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांनी विकासकामाकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाही. कारण ही नेतेमंडळी आपापसात तू तू मैं मैं करत, सर्वजण अस्तित्वाची राजकीय लढाई लढताना दिसत आहे.
प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे प्रतिनिधी सर्वच पक्षांना, त्यांच्या प्रतिनिधींना भेटले. मात्र, त्यांच्या पदरात फक्त सांगतो-पाहतो-करतो-भेटतो अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि यामुळेच या विभागात प्रगती झाली नसून लोकप्रतिनिधींची मात्र जोरदार प्रगती झालेली दिसत असल्याचा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. जनसामान्यांचे लक्ष नसल्यामुळे अनेक सरकारी योजना खिशात गेलेल्या दिसतात. सर्व एकाच माळेचे मणी असल्याचा अनुभव मिळत असताना आत्ता तर आयाराम गयाराम पेक्षा नेत्यांचे शुध्दीकरण होताना दिसत असल्याचे सांगून सी. आर. म्हात्रे यांनी सध्याच्या राजकारणात नीतिमत्ताच शिल्लक राहिली नसल्याचे सांगितले.
शेवटी सी. आर. म्हात्रे यांनी लोकांच्या मतांना किंमतच राहिली नसल्याचे सांगून अभिनेते नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत एका नेत्याची बोलती बंद केल्याच्या घटनेची आठवण करून दिली.
खरं पाहायचं तर सी. आर. म्हात्रे यांनी व्यक्त केलेल्या मतांचा जनसामान्यांनी विचार करणे गरजेचे आहे. कारण आमच्या मतांना काही किंमत आहे का? हा नाना पाटेकर यांनी त्या नेत्याला विचारलेला प्रश्न खरंच खोलवर जखम करणारा होता.
