रवाळजे येथील घटना, माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
सलीम शेख
माणगाव : सख्या बहिणीचा खुन केल्याप्रकरणी बहिण व तिच्या पतीस न्यायालयाने दोषी धरले असून माणगाव सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सदरची घटना माणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत रवाळजे येथे मयत हिचे राहते घरी घडली होती .
सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, सदर खटल्यातील मयत अरूणा विठोबा उभारे या प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे आरोग्य सेविका म्हणून कामात होत्या. त्यांचा घटस्फोट झाल्याने त्या मौजे रवाळजे येथे एकटयाच राहत होत्या. मयत या त्यांची आरोपी बहिण सुरेखा व तिचे आरोपी रमेश मेंगडे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकरीता व घर खर्चाकरीता नेहमी आर्थिक मदत करत असत. त्यांना कामानिमित्ता बाहेरगावी जायचे असल्याचे मयत या स्वतःचे दागिणे हे आरोपींकडे सांभाळणेकरीता ठेवत असता. सदर गुन्हा घडण्यापूर्वी २०१८ मध्ये मयत या चारधाम यात्रेस जात असतांना आपले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ही आरोपींना सांभाळण्याकरीता दिली होती. त्यानंतर आरोपीत यांनी मृतक अरूणा विठोबा उभारे हिने दुसरे लग्न केल्यास सर्व संपत्तीवरचा आपला हक्क निघुन जाईल म्हणुन आरोपींनी मयत हिस जीवे ठार मारण्याचा कट रचला.
मयत ही चारधाम यात्रेहून परत आल्यानंतर ता. २९ मे २०१८ रोजी रात्रीच्या वेळी आरोपीत यांनी संगनमत करून मयत अरुणा हिचे घरात प्रवेश करून तिचे हात पाय बांधून, ब्लाउजने गळा आवळून सोन्याचे दागिने व कपाटातील रोख रक्कम जबरीने चोरली व याबाबत आरोपीत रमेश मेंगडे यानं स्वतः माणगाव पोलिस ठाणे येथे जावून अज्ञात व्यक्तिविरूध्द खुन व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचा तपास माणगाव पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा हे करत असतांना आरोपी रमेश मेंगडे व सुरेखा मेंगडे यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सदर गुन्हा हा त्यांनीच केला असल्याचे कबुल करून गुन्हयातील चोरीचे दागिणे व रोख रक्कम आरोपींनी काढून दिली.
वरील घटनेची फिर्याद माणगाव पोलिस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम ३०२,३९२, ४५०,१२० (ब), २०३, १७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा विभाग रोहा यांनी केला व सदरचे दोषारोप पत्र मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय, माणगाव -रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये जितेंद्र डी. म्हात्रे अति. शासकिय अभियोक्ता, यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान तत्कालीन पैरवी अधिकारी श्री यु.एल. घुमास्कर, पोलिस उपनिरीक्षक, पैरवी अधिकारी अनंत पवार, पोलिस उपनिरीक्षक, छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार, पोह व शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. तसेच मा. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील आरोपी यांना दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दोषी धरून सदर केसचा निकाल घोषित केला परंतु केसमध्ये आरोपीस होणाऱ्या शिक्षेबाबत अंतिम सुनावणी दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ठेवण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या कामी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतुद कायद्यामध्ये आहे. आरोपींना मा. न्यायालय कोणती शिक्षा देणार यांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
