गणेशोत्सवात यंदा १६३ बसमधून मिळाले उत्पन्न, गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ
सलीम शेख
माणगाव : कोकणात गौरी-गणपती या सणाला प्राचीन काळापासून फार महत्व आहे. या सणाला कोकणवासीय नागरिक आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला असतो. त्यामुळे त्यांची गावाकडे जाण्याची आस अधिकच गडद होते. या गणेशभक्तांना त्यांच्या मूळ गावी जावून आपल्या आवडत्या गणरायाचे वेळेत दर्शन मिळावे तसेच गौरी-गणपती विसर्जनानंतर परत आपल्या कर्मभूमीकडे वेळेत पोहोचता यावे यासाठी माणगाव बस आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी नेटके बस फेऱ्यांचे नियोजन करून १६३ बसमधून प्रवाशांना सेवा पुरवली. यामुळे माणगाव बस आगाराला ८,५०,९८२ रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अधिकच्या २४ बसमधून प्रवासी वाहतूक केल्यामुळे यंदाचे वर्षी उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
गौरी-गणपती परतीची जादा वाहतूक २०२३ च्या अनुषंगाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाने सर्व आगारांना दरवर्षी प्रमाणे उत्पन्नाचा इष्टांक घालून दिले होते. माणगाव बस आगाराने उत्पन्न ८,५०,९८२ रुपये एवढे उत्पन्न मिळविले. गेल्या वर्षी माणगाव आगाराने १३९ बस गाड्याचे नियोजन केले होते त्यातून ७,७२,४१४ रुपये एवढे उत्पन्न घेतले होते. या उज्ज्वल यशात माणगाव बस आगराचे व्यवस्थापक, सर्व परीवेक्षक, चालक, वाहक, यांत्रिकी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान मिळाले. गणेशोत्सव काळात माणगाव बस आगारातून १६३ जादा बस गाड्या सोडल्या होत्या. यामध्ये मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा, पनवेल, या भागातील प्रवाशांवर लक्ष केंद्रित करून नेटके नियोजन केले होते. माणगाव येथे ता. १४ एप्रिल २०११ मध्ये आगार अस्तित्वात आले. त्याला १२ वर्ष लोटले. कोरोन काळात या बस आगाराची उत्पन्नात पीछेहाट झाली असली तरी गेल्या दोन वर्षापासून त्या उत्पन्नाची तुट भरून काढीत गणेशोत्सवात नेटके नियोजन करून आगाराने विक्रम केला. माणगाव आगाराने केलेल्या या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे.
