मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार; दिपश्री गुरव-घासे सरपंच पदाच्या उमेदवार
किरण लाड
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आहे. जसजशी निवडणुकीची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतशी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जनता पार्टी बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनीही ग्रामपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा करुन सरपंच पदासाठी दिपश्री गुरव-घासे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीचा कार्यकाल मे, 2023 रोजी संपला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहिर केला असून लोकांतून निवडूण देणाऱ्या नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलाकरिता राखीव आहे. नागोठणे ग्रामपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक ५ नोव्हेंबरला येऊन ठेपली आणि शिवसेना (ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना (शिंदे गट), मनसे तसेच इतर राजकीय पक्षांची धावपळ सुरु झाली आहे. भारतीय जनता पार्टीने नागोठणे ग्रामपंचायतीच्या १७ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊन नागोठणेच्या राजकारणात पहिली उडी मारुन आघाडी घेतली. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागोठणेकर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहिर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस स्नेहलताई जाधव, वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊन महिला सरपंच पदासाठी नागोठणे गूरवआळी येथील मनसे रोहा तालुका महिला अध्यक्षा दिपश्री गुरव-घासे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे व शहरातील मनसे पदाधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, मनसे खूप वर्षानंतर नागोठणे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरत असून ह्या निवडणुकीत चांगले यश पक्षाला प्राप्त होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. सर्वच राजकीय पक्षाने नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचारात कोण मुसंडी मारणार आणि जनता जनार्दन कोणत्या पक्षाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
