शशिकांत मोरे
धाटाव : रोहे तालुक्यातील कोलाड वरसगाव हद्दीत शुक्रवारी (दि. ६ ऑक्टो.) रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंप नजीक रोडच्या कडेला पार्कींग केलेल्या ट्रकचे टाकीमधुन डिझेल चोरी करताना ३ आरोपी रात्रीची गस्त करणाऱ्या पोलिसांना मिळून आले आहेत. या तिघांना कोलाड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या कडील स्कॉर्पीओ गाडीही जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० ते ५ वाजण्याचे दरम्यान कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील वरसगाव येथील पेट्रोल पंपानजीक रोडच्या कडेला पार्कींग केलेले ट्रकचे डिझेल टाकीमधुन काही इसम डिझेल चोरी करत असताना व चोरी केलेले डिझेल हे कॅनमध्ये भरून सदरचे कॅन हे स्कॉर्पीओ गाडीतुन घेवुन जाण्याचे बेतात असताना कोलाड पोलीस ठाणेकडील रात्र गस्तीवरील अंमलदार पोहवा पाटील, चालक पोना महाडीक यांना आढळून आले. सदरचे इसमांनी पोलीसांना पाहुन त्यापैकी दोघे झाडीमध्ये पळाले तर एकजण स्कॉर्पीओ गाडीसह त्याठिकाणावरून पळुन जात असताना त्यास स्कॉर्पीओ गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांनी रात्र गस्तीवरील पोलीस नाईक मोरे, तसेच वाहतुक नियंत्रण करण्याकरीता असणारे ट्राफिक वॉर्डन यांचे मदतीने यांना पळुन गेलेले इसमांचा आजुबाजुचे झाडी झुडपांमध्ये शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. चोरी करत असताना मिळुन आलेले स्कॉर्पीओ गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेचे एकुण ८ प्लास्टीकचे कॅन त्यामध्ये एकुण २८० लिटर डिझेल मिळुन आले. आरोपीत हे सदरचे ट्रक चालक यांना दमदाटी करून मारून टाकण्याची धमकी देवून सदरचे डिझेल चोरी करून घेवुन जात असताना मिळुन आलेले आहेत.
सदर आरोपीत यांची नावे (१) राजेश भगवान पवार, रा. कोपरखैरणे नवी मुंबई, (२) इशाक अश्फाक खान, रा. रोडपाली, नवी मुंबई (३) साजीद इस्लाम शेख, रा. वाशी, नवी मुंबई अशी आहेत. आरोपीत यांचे विरोधात या अगोदर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर बाबत कोलाड पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ९४/२०२३ भा.द.स. कलम ३९२, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात एकुण ४,२१,०४० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चेतन कुथे हे करीत आहेत.
