वैशाली कडू
उरण : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा. कारण ह्या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून; कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे शुभहस्ते करण्यात आला होता.

राज्यात ६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांनी “गांधीगिरी” करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून, Lets Change फिल्म मधील “सरदार पटेलबाजी” करत घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर video करून सोशल मीडिया ला शेअर करणे त्यांच्या आवडीचे काम बनून जाते. पहिल्या टप्प्यात असे १५ लाख हुन अधिक विडिओ शेअर झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या संकल्पनेला गती मिळालेली आहे, आणि “दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर गिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी/प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी point-out केले तर सगळेच जास्तीतजास्त जागरूक राहतील, आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल” अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी दिली आहे.

पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केले जाणार आहे. मोठीजुई शाळा राज्यातील सर्वोत्तम १०० च्या यादीत समाविष्ट आहे. त्याच बरोबर निवडक विद्यार्थ्यांना “महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर” Identity Card ने गौरवण्यात येणार आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्र.संजय होळकर सर यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागो जागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले, आणि शाळा समन्वयक श्री.कौशिक ठाकूर सर आणि सर्व वर्ग शिक्षक नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन देत होते. मोठीजुई शाळेत हा उपक्रम गेले दोन महिने सुरू असून इ.दुसरी पासूनचे विद्यार्थ्यांकडून विविध आलेले अनुभव व त्यांनी त्यावर केलेल्या प्रतिक्रियेचे विविध व्हिडिओ हे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. मोठीजुई शाळेची PLC स्वच्छता मॉनिटर मध्ये राज्यात पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत,ग्रामस्थ व पालकांच्या वतीने सर्व स्वच्छता मॉनिटर यांचे अभिनंदन व सत्कार समारंभ करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेची निवड झाल्याबद्दल रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बाष्टेवाड, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी माध्यमिक रायगड जिल्हा समन्वयक ज्योत्स्ना शिंदे-पवार, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे तसेच सर्व जिल्हा प्रशासन, उरण तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व तालुका समन्वयक प्रियांका म्हात्रे, केंद्र समन्वयक व केंद्रप्रमुख टी. जी. म्हात्रे, तालुका प्रशासन, सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.
