घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी आंनद नगर येथे जप्त केलेल्या टपऱ्या पुन्हा होत्या त्या जागेवर आणून ठेवले असल्याची चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे. सदरची टपरी पुन्हा सुरू होऊन त्यामध्ये गुटखा व नशिली पदार्थांची विक्री होत असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
नगरपालिका हद्दीतील हातगाड्या व टपऱ्यांवर काही महिन्यांपूर्वी कारवाई करून जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही दिवस रस्ता मोकळा दिसत होता. परंतु पुन्हा जैसें थे परिस्थिती असल्याचे दिसत आहे. भर रत्यावर हातगाडी व टपरीधारक ठाण मांडून बसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यावर ना नगरपालिका, ना वाहतूक शाखेचे नियंत्रण राहिले आहे. त्यामुळे हातगाडी व टपरीधारकांची दादागिरी वाढली आहे. त्यात भर म्हणून काही दुकानदारांनी आपल्या समोर चिरीमिरी घेऊन हातगाड्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
उरण नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी आंनद नगर येथील टपरी जप्त केल्या होत्या. त्या टपऱ्या पुन्हा होत्या त्या जागेवर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आणून ठेवल्याची माहिती आजूबाजूचे दुकानदार देतात. यावरून उरण नगरपालिका टपऱ्या जप्त करून त्या पुन्हा स्वतः आणून देत असल्याची प्रचिती या निमित्ताने आली आहे. सदर पान टपरीमधून गुटखा व इतर नशिली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. तरी सदर अनधिकृत टपरीवर कारवाई करण्याची मागणी आंनद नगरमधील रहिवाशांकडून केली जात आहे.
