सलीम शेख
माणगाव : शहरातील एका फळविक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात कचरा टाकल्याचे एका सुजाण नागरिकाच्या निदर्शनास आले. सदर फळविक्रेत्यास माणगाव शहरातील सुजाण नागरिकाने विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, येथे कचरा टाकू नये असे कोणतेही फलक लावलेले नाही त्यामुळे आम्ही कचरा टाकत आहोत असे उर्मट उत्तर देऊन फळविक्रेता निघून गेला. त्यांनतर सदर नागरिकाने माणगाव नगरपंचायत कार्यालयात त्याविषयी माहिती दिली व कचरा टाकणाऱ्या गाडीचा फोटो दाखविला.
त्यानुषंगाने माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दखल घेऊन तात्काळ फळ विक्रेत्याचा शोध घेतला व सदरील फळविक्रेत्यास कार्यालयात बोलवून घेतले. त्याप्रसंगी कार्यालयात उपस्थित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती दिनेश रातवडकर, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक, नगरसेविका ह्यांनी फळविक्रेत्यास जाब विचारला असता त्याने कचरा टाकल्याचे कबूल केले. मुख्याधिकाऱ्यांनी सदरील फळविक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असता फळविक्रेत्याने सर्वांसमक्ष मी टाकलेला कचरा उचलतो, मला माफ करा असे कबुल केले. माणगाव नगरपंचायत शहर समन्वयक अतुल जाधव ह्यांचे उपस्थितीत दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी फळविक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात टाकलेला कचरा जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून घेतला.
माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांचे मार्फत सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, सर्व नागरिकांनी नगरपंचायत घंटा गाडीमध्येच कचरा टाकावा. मोर्बा रोड परिसरात तसेच शहरातील कोणत्याही परिसरात फळविक्रेते, भाजीपाला विक्रते किंवा नागरिक कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपात कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
