सलीम शेख
माणगाव : माणगाव काळनदी पुलाजवळील साईड पट्ट्यांचे काम लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम खात्याने मार्गी लावावे अन्यथा नजीकच्याच काळात या प्रश्नासंदर्भात उग्र आंदोलन करू असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव काळनदी पुलाच्या पुढे साईड पट्ट्या भरणे आवश्यक आहे. या साईड पट्ट्या रस्त्यापासून एक फूट खाली आहेत. त्यामुळे अनेकवेळा वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत असते. रात्रीच्या वेळेस लहान-मोठे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. सणासुदीच्या काळात महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकी, तीन चाकी गाडीवाले आपले वाहन रस्त्याच्या खाली उतरवून मार्ग काढीत असतात. या वाहनांना नंतर अनेकवेळा पुन्हा आपली वाहने रस्त्यावर घेणे जोखमीचे होते. तसेच पादचारी व्यक्तींना व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या साईड पट्ट्या भरल्या नसलेले विशेष करून पावसाळ्यात त्याचा त्रास सहन करायला लागतो. अनेकवेळा रात्रीच्या वेळेस या साईड पट्ट्या लक्षात न आल्याने अनेक वाहनांचे या ठिकाणी छोटे- मोठे अपघात झालेले आहेत. तरी या प्रश्नाकडे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम खात्याने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या साईड पट्ट्यांचे काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करून पूर्ण करावे अन्यथा या प्रश्नाबाबत नजीकच्याच काळात उग्र आंदोलन केला जाईल असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना दिला आहे.
