किरण लाड
नागोठणे : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. मे २०२३ ला नागोठणे ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. प्रशासकीय अधिकारीव्दारे ग्रामपंचायतीचा कारभार चालत आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाला यंदा चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीवर मागील सत्ता शिवसेनेची होती. मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही शिवसेनेची कॉंग्रेस बरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) यांची महाआघाडी होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबरपासून उमेदवार निवडणूकीचे फाॅर्म भरण्यास सुरुवात करणार आहेत. नागोठणे ग्रामपंचायतीचे एकूण ६ वाॅर्ड आहेत. सर्वच पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी, विरोधकांना प्रचारासाठी अनेक मुद्दे आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असणारा नागोठण्याचा फिल्टर पाणी, डम्पिंग ग्राऊंड, युवकांना खेळण्यासाठी मैदानाची कमरतता, शिवाजी चौकात भेडसावणारी वाहतुकीची समस्या असे अनेक मुद्दे प्रचारात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकीत उडी घेऊन सर्वात प्रथम सरपंच पदासाठी दिपश्री गुरव-घासे हिच्या नावाची घोषणा करुन निवडणूकीत रंगत भरली आहे.
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकीत एकुण ६ वाॅर्ड आहेत. वाॅर्ड क्रं. १,२,४,५,६ मध्ये ३ उमेदवार तर वाॅर्ड क्रं. ३ मध्ये २ उमेदवार असे एकूण १७ उमेदवार ग्रामपंचायतीवर निवडून जाणार आहेत. नागोठणे ग्रामपंचायत मधील इतर ५ वाॅर्डापेक्षा वाॅर्ड क्रं. ४ प्रचाराच्या व मतदारांच्या दृष्टीने सर्वात मोठा वॉर्ड आहे. या वाॅर्डामध्ये एकूण २२६९ मतदार आहेत. त्यात स्त्री मतदार ११२५ तर पुरुष मतदार ११४४ आहेत. कुंभारआळी, मराठाआळी, गवळआळी, रमाईनगर, मीरानगर, आझाद मोहल्ला, गोरोबा नगर, मोवन विहार बिल्डिंग परिसर असा मोठ्या मतदार संघाचा वाॅर्ड असल्याने उमदेवारांची सर्व बाजूनी दमछाक होणार आहे. या प्रभागात मागील निवडणुक देखील चुरशीची होऊन शिवसेनेचे तीनही उमेदवार या प्रभागातून निवडून आले होते. जरी युती, आघाडी, महाआघाडी होणार असल्या तरी जोपर्यंत उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीसाठी अर्ज भरत नाही तोपर्यंत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
