घन:श्याम कडू
उरण : केळवणे गावात गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान वाघेश्वर भागात अगदी लोकवस्ती असलेल्या रहदारीच्या ठिकाणी ग्रामस्थांना चक्क बिबट्याचे दर्शन झाले आहे.
केळवणे गावाची वाघेश्वर टेकडी ही चिरनेरच्या जंगलाचा पूर्वार्ध भाग आहे. केळवण्याच्या या टेकडी पासूनच चिरनेरचे जंगल सुरु होते. चिरनेरच्या जंगलात हिंस्त्र श्वापदांचा पूर्वापार वावर आहे. सध्या जंगलतोड आणि भूमी उत्खनन यामुळे अनेक जंगली श्वापद आपले ठिकाण सोडून सैरभैर झाले आहेत. अशातच कधीकधी रस्ता चुकून ते लोकवस्तीत दिसून येतात. गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी अशीच बिबट्याची पावलं दिघाटी साई दरम्यान लोकांना दिसून आली होती. परंतू, बिबट्याला केळवणे गावातील ग्रामस्थांनी घराजवळ बघितले आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

केळवणे वाघेश्वर टेकडी हे पन्नास ते साठ घरांचे 300च्या आसपास लोकवस्ती असलेले ठिकाण आहे. तेथे गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान एक दहा-बारा वर्षाचा मुलगा दुकानावर गेला असताना त्याला दोन घराच्या मधल्या गल्लीत बिबट्या दिसला. त्याने आरडाओरडा केल्यावर बाजूच्या घरातील विनोद घरत या युवकाने आजूबाजूच्या लोकांना सतर्क केले. परंतु, लोक जमल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला. त्यानंतर लोकांनी खूप शोधल्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. बहुधा तो जंगलाच्या दिशेने पळून गेला असावा. तरी सदर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
