१५ डिसेंबरपर्यंत पाणी द्या; खांब, धामणसई विभागीय शेतकऱ्यांनी दिला इशारा
विश्वास निकम
गोवे-कोलाड : शेतीच्या पाण्यासाठी खांब, देवकान्हे, धामणसई विभागातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून डोलवहाळ सिंचनातून उजवा तिर कालव्याला येत्या १५ डिसेंबरपर्यंत पाणी द्या, कोणतीही सबब ऐकली जाणार नाही तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत कालव्याची उर्वरित दुरुस्ती तसेच गाळ काढण्यात यावा अशी आग्रही भूमिका घेत याबाबत कोलाड पाठबंधारे खात्याला ईशारा देत उपभियंता यांना निवेदन दिले आहे.

रोहा तालुक्यातील खांब, देवकान्हे, धामणसई या विभागातील शेतकऱ्यांना कालवा दुरुस्तीच्या नावाखाली डोलवहाळ सिंचनातून कोलाड पाटबंधारे विभाग गेली अनेक वर्ष पाणी देत नाही. त्याची दुरुस्तीही केली गेली आहे मात्र, पाणी येथील शेतकऱ्यांना देण्यास पाठबंधारे खात्याची नकारात्मक भूमिका असल्याने या अनुषंगाने शेतकरी आता चांगलेच आक्रमक होत मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी याबाबत कोलाड पाठबंधारे विभागाला येत्या १५ डिसेंबरपर्यंत कालव्यातील गाळ, कचरा साफ करून पाणी द्या या मागणीसाठी बंधारे शाखेचे उप अभियंता अतुल आवगने यांना निवेदन दिले आहे.
यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बामणे, वसंत मरवडे, मारुती खांडेकर, धोंडू कचरे, जाधव, शिर्के, संतोष भोईर, डॉ. श्याम लोखंडे, खेळू ढमाल, संतोष खेरटकर, महेश तुपकर, हेमंत मालुसरे, उजवा तिर कालवा शेतकरी नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे,उडदवणे, सांगडे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठाण, पिंगळसई तर्फे अष्टमी विभागातील बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी शेतीसाठी मिळावे. सिंचनासाठी असणारी ओलिताखालील जमीनीवर पिके पिकवायची आहेत आणि ओसाड झालेल्या जमिनींना सुजलाम सुफलाम करायचे आहे. तरी आमच्या अर्जाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून पाणी सोडण्याबाबतीत कार्यवाही करावी व ह्या चालूवर्षी पाणी सोडून आम्हाला न्याय द्यावा. आमच्या पंचक्रोशीतील शेतकरी अतिशय संतापलेले आहेत आणि ते आता आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. मग त्यानंतर आमच्या देखील हातात काही राहणार नाही. पुढील होणाऱ्या परिणामाला पूर्णपणे आपण जबाबदार असाल याची कृपया नोंद घ्यावी तरी आमच्या अर्जाचा विचार करावा व पाणी सोडावे.
-खेळू ढमाळ,
धामणसई विभाग
देवकान्हे विभागीय शेतकरी यांची एकत्रित घेण्यात आली. सभेत गावनिहाय पाणी घेण्याबाबत विचारणा झाली. त्यानुसार प्रत्येक गावाने सिंचन हंगाम २०२३-२४ मध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. शेतीसाठी पाण्याच्या मागणीचे निवेदन देत सिंचन हंगाम सन २०२३-२४ करता आपल्या शाखा कालव्याद्वारे डिसेंबर २०२३ मध्ये पाणी सोडण्यात यावे. २०१२ पासून अद्यापपर्यंत या कालव्याद्वारे सिंचनाकरता पाणी सोडण्यात आलेले नसल्याने सद्यस्थितीत कालव्यात ठिकठिकाणी गाळ साठला आहे व गवत वाढले आहे. त्यामुळे कालव्याची स्वच्छता करून १५ डिसेंबरपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे.
-वसंतराव मरवडे
देवकान्हे विभाग.
सदरच्या शेतकरी वर्गाने केलेल्या मागणीचा विचार करून येत्या काही दिवसात येथील परिसरातील उजवा तिर कालवा १८ गावांतील शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांची लवकरच बैठक घेत यावर मार्ग काढला जाईल. तसेच कालव्याच्या दुरुस्तीची कामे आदी मशनरी लावून वेळेत पूर्ण करू. कालव्याचे पाणी मुदतीत सुरू करू.
-अतुल आगवणे
उप अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड
