कारवाईत संबधित प्रशासनाचा हात आखडता?
शशिकांत मोरे
धाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आदर्शवत ठरलेल्या धाटाव ग्रामपंचायतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री राजरोसपणे सुरू असून, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कारवाईत प्रशासनाचा हात मात्र आखडता असल्याचे बोलले जात आहे. गावठी दारूमुळे अनेकांचे बळी गेले असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्यामुळे गावठी दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावेत अशी आग्रही मागणी होत आहे.
या गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेतच मात्र याचा सर्वात जास्त परिणाम आदिवासी समाजावर होत आहे. कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत. तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनविण्यात येत असल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाला शहर आणि ग्रामीण भागात चालणारे अवैध गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धाटाव गावात, वाड्या, वस्ती आणि आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळप आणि विक्री होते. गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यापेक्षा अधिक अधिकार उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाला आहेत. परंतु, अवैध मद्य वाहतूक, विक्री रोखण्यात या विभागाची समाधानकारक कारवाई अद्याप झालेली दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता अशा अवैधरीत्या उत्पादित होणार्या दारू विरोधात व्यापक कारवाई होणे गरजेचे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून अवैध दारू विरोधात केस केल्या जात असल्या तरी त्याची निर्मिती बंद झालेली नाही. आजूबाजूचे आदिवासी वाड्या या ठिकाणी हातभट्टी आणि गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री होत आहे. गावठी दारू उत्पादनासाठी जंगलांत घराचा वापर केला जात आहे. सध्या गावठी दारूची सर्रास विक्री होत आहे. सुरवातीला अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी नवसागर आणि काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र अलीकडच्या काळात मात्र गावठी दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे.
ही दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा देखील नष्ट होत आहे. त्यामुळे वन विभागाने देखील आता अवैध दारू धंदे करणार्यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे.
