• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिटफंड घोटाळ्यातील आरोपी सतीश गावंडला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; संपत्तीवर येणार टाच

ByEditor

Oct 17, 2023

घन:श्याम कडू
उरण :
चिटफंड प्रकरणी दुसऱ्यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याच्या इतरही संपत्तीची माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्यामुळे या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाली असल्याने या कालावधीत त्याच्या इतरही छुप्या साथीदारांची माहिती उघड होणार आहे.

चिटफंडच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सतीश गावंड याला दुसऱ्यांदा अटक करण्यात पोलिसांना अडीच महिन्यांनी यश आले आहे. गुन्ह्यामध्ये अटक होताच त्याने दर आठवड्याला पोलिसांसमोर चौकशीला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयातून जामीन मिळवला होता. मात्र, जामीन मिळताच त्याने पोबारा केला होता. यामुळे पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करून पुन्हा त्याच्या शोधासाठी कंबर कसली होती. परंतु, अडीच महिन्यांपासून तो फरार होता. अखेर मध्य प्रदेशमधून गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याला अटक केली. यावेळी न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबर पर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे. यामध्ये चौकशीत त्याची इतरही अधिक संपत्ती पोलिसांसमोर आली आहे.

यापूर्वी पोलिसांनी त्याची सुमारे ७० कोटीची संपत्ती जप्त केली आहे. तर अशाच चिटफंडच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या सुप्रिया पाटीलची देखील सुमारे ८० कोटीच्या संपत्तीवर पोलिसांनी टाच आणली आहे. त्यात गावंडची देखील अधिक संपत्ती समोर आल्याने त्यावर देखील कायदेशीर जप्ती आणली जाणार आहे. चिटफंडच्या माध्यमातून दोघांनी सुमारे ४०० कोटींचा अपहार केला आहे. त्यामध्ये दोन हजाराहून अधिक नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी या दोघांची संपत्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिस करत आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या अधिकाधिक नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांकडून सातत्याने होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!