• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निगडी ग्रामपंचायतीसह गावातील शिवसेना, काँग्रेस कार्यकर्ते आता राष्ट्रवादीच्या विकास रथात -खा. सुनील तटकरे

ByEditor

Oct 16, 2023

वैभव कळस
म्हसळा :
तालुक्यातील मोठ्या लोक वस्तीच्या निगडी गावात मागील ५२ वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. मागील ३१ वर्षापासून येथील ग्रामस्थांची गावात ग्राम पंचायतीचा कार्यालय असावा अशी लोकभावना होती त्याची पूर्तता करताना खासदार सुनिल तटकरे यांनी १५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत घट स्थापनेचेच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे हस्ते ग्राम पंचायत कार्यालयाचे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या निधीतून ३० लक्ष रुपये मंजुर केलेल्या निवाराशेड बांधकामाचे भूमिपूजन एकाच वेळी करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती छाया म्हात्रे,फैसल गीते, संदीप चाचले,संजय खांबेटे,मिना टिंगरे,सोनल घोले,रेश्मा काणसे,वनिता खोत,प्रियंका निंबरे,समिर काळोखे, मधुकर गायकर,शाहीद उकये,बिलाल कौचाली,रमेश काणसे,गजानन पाखड,श्रीकांत बिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजीत सत्कार सोहळ्यात खासदार तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना निगडी गावात ग्रामपंचायत कार्यालय व्हावे अशी स्थानिक व मुंबई निवासी ग्रामस्थांची लोकभावना होती त्याची पूर्तता करतानाच संपुर्ण निगडी ग्रामस्थानी पक्षाचे विकास रथात बसण्याचा निर्णय घेतला याचा आपणास मनोमन आनंद झाला आहे. गावाचे पक्ष प्रवेशाने विकासाला ताकद आणि शक्ती मिळत असल्याने निगडी ग्रामस्थांना धन्यवाद दिले. विकास करायचा असतो तो पुढील २४ वर्षांची दुरदृष्टी ठेवून आणि काम करायचे असते तो लोकांना आपलेसे वाटावे असे म्हणुन आपण भावनेवरती आधारीत राजकारण करत नाही तर विकासावर आधारीत राजकारण करत असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले. उद्याच्या भविष्याची उभारणी करीत असताना जेव्हा गाव एकसंघपणाने काम करीत असतो तेव्हा गावाचे विकासाला खऱ्या अर्थाने ताकद आणि शक्ती मिळत असते. ही ताकद आणि शक्ती देण्याचे काम आम्ही करीत आहोत. १९९५ नंतर या मतदार संघात विकासाचे राजकारण बाजुला सारले गेले आणि केवळ लोकांच्या भावना भडकवत त्यांचे भावनेला हात घातला गेला. त्यामुळे येथील १५ वर्षे रखडलेला विकास अनुभवायला मिळाला. निगडी गावाशेजारील मार्गावरून १ नव्हे १००० वेळा मतदार संघात जात येत असताना येथे विकास नाही तर फक्त भगवा फडकताना पहायला मिळत असल्याची आठवण दिली. आता गावात विकासाला निधी कमी पडणार नाही. केवळ बांधकाम निधी उपलब्ध करुन देणे एवढ्यावरच मर्यादित न राहता काबाडकष्ट करणाऱ्या माता भगिनिंच्या हाताला काम आणि त्यांचे मनोबल वाढविण्याचे दृष्टिने काम केले जाईल असे आश्वासन देताना ग्रामपंचायत इमारती शेजारी महीला बचत गटाचे व्यवसाय उद्योगासाठी भव्य दालन किंवा बचत गट केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगितले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने राज्यात सुकन्या योजना कार्यान्वित करण्यात आली आहे त्या योजनेची माहिती देताना महिलांना सक्षम करण्यासाठी जी मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही वचनबध्द असल्याचे सांगतानाच महीला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी उमेदच्या मार्फत निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

या मतदार संघातील जनतेने एके काळी केंद्रांत आणि राज्यात मंत्रिपद भूषविलेले दिवंगत बॅ. अंतुले साहेब, बहुजन समाजातील नेते र. ना. राऊत, स्थानिक पातळीवर कुणबी समाजाचे नेतृत्व करणारे माजी सभापती सहदेव शिंदे, ना. म. दळवी यांची कार्यकिर्द पाहिली आहे. समाजातील तळागाळातील कार्यकर्त्याला पक्षाचे माध्यमातुन जेव्हा जेव्हा संधी देता आली तेव्हा तेव्हा ती देत आलो आहोत. याच मतदार संघातुन पंचायत समितीमध्ये निवडून आलेले आणि उपसभापती पद भूषविलेले संदिप चाचले, जिल्हा परिषद सदस्य ते सभापती झालेले बबन मनवे यांचे नाव घेत कार्यपूर्ती केली असल्याचे खासदार तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. निगडी गावाचा विकास व्हावा म्हणुन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष फैसल गीते यांचे पुढाकाराने संपुर्ण निगडी ग्रामस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेश कर्त्यांमध्ये प्रामुख्याने काँगेस नेते माजी तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच महादेव भिकु पाटील, सरपंच वेदिका पाखड, उपसरपंच जयवंत मोरे, गावअध्यक्ष रमेश काप, मुंबई अध्यक्ष चंद्रकांत शिगवण आणि शेकडो ग्रामस्थांचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून गाव विकास आणि पक्षात मानाचे स्थान मिळणार असल्याचे आश्र्वासित केले आहे. मतदार संघातील सर्वच मार्ग आणि गाव अंतर्गत रस्ते चकचक झाले आहेत याची माहिती देताना आता नव्याने मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातुन ह्याम अंतर्गत १.२५ कोटी रुपये खर्चाचा रोहा,मांदाड , रोवळा वाशी मार्गे पाभरे पर्यायी मार्गाने म्हसळा असा रस्ता प्रस्तावित आहे तर दुसरा टोळ, विर, पांगलोली मार्गे बागमंडला हा रस्ता बांधकाम पूर्ण करून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!