प्रतिनिधी
पेण : पेण खारेपाट विभागातील दीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शेकाप पुरोगामी संघटना पेण तालुका अध्यक्ष माजी मंत्री स्वर्गिय भाई मोहनराव पाटील यांचे खंदे समर्थक, शेकाप पक्ष संघटनेत महत्त्वाची कामगिरी बजावून अखेरच्या श्वासापर्यंत इनामे इतबारे पक्षकार्यात सक्रिय राहिलेले, सरपंच कसा असावा याची दखल घेण्यास नवोदित सरपंचाचे आदर्श ठरणारे व्यक्तीमत्व जयप्रकाश रामभाऊ ठाकूर यांचे वयाच्या ६७व्या वर्षी सोमवारी, सायंकाळी ६.१५ वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सकाळी ९ वाजता दीव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, यामध्ये माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, प्रभाकर म्हात्रे, सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे, उपसभापती नितीन पाटील, भाजप पेण विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर, शिवसेनेचे अनंत पाटील, नंदकुमार मोकल, शिंदे गटाचे अशोक वर्तक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद तथा बंड्याशेठ पाटील, वाशी सरपंच गोरखनाथ पाटील, बोर्झे सरपंच विजय ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक के. डी. म्हात्रे, मसद सरपंच हरीचंद्रभाऊ पाटील, महाविरण राज्य कर्मचारी संघटना अध्यक्ष अभियंता संजय ठाकूर, वाशी शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते दिपकशेठ पाटील, शेकापचे वाय. के. पाटील याशिवाय विविध सामाजिक सेवाभावी संस्था प्रतिनिधी, पत्रकार मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. जयप्रकाश ठाकूर यांच्या राजकीय क्षेत्रातील कारकीर्द व धडाडी याबाबत अनेक मान्यवर मंडळींनी मनोगत व्यक्त केले. शेवटी अनेक मान्यवर नेते मंडळींनी पुष्पहार अर्पण करून या लढवय्या नेत्याला अखेरचा लाल सलाम ठोकला.
