शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे जवळील श्री क्षेत्र आमडोशी येथील सदानंदाश्रम मठाचे मठाधीपती गुरुवर्य श्री गुरूदास अनंत महाराज जांबेकर यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त शुक्रवारी (दि. 20) त्यांचा अमृतमोहस्तवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 75 मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गुरुबंधू गणेश जाधव यांनी दिली.

अमृतमोहस्तवी अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सकाळी 5 ते 6 वा. काकड आरती, सकाळी 7 ते 8 वा. माऊलींची पाद्यपुजा, सकाळी 8 ते 9 वा. ग्रामदैवत श्री माणकेश्वर महाराज व गुरुमाऊली श्री समर्थ सदगुरु ताईसाहेब महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक, सकाळी 10 ते 11 वा. पंचाहत्तर पूर्ती एंद्री शांती यज्ञ, सकाळी 11 ते 12 वा. रजिप केंद्र शाळा आमडोशी येथील शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी भेटवस्तू वाटप, दुपारी 1 ते 2 वा. दुपारचा महाप्रसाद, दुपारी 3 ते सायंकाळी 6 वा. अभ्यंगस्थान, औक्षण व तुलादान, सायंकाळी 6 ते रात्री 8 वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, रात्री 8 ते 9 वा. रात्रीचा महाप्रसाद, रात्री 9 ते 11 वाजता हभप सुभाष महाराज घाडगे (कोळेवाडी, सातारा ) यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच रात्री 11 ते 12 वा. श्री स्वामी समर्थ प्रासादिक मंडळ नागोठणे यांचे संगीत भजन आशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सदानंदाश्रम मठाकडून देण्यात आली आहे.
| गुरुवर्य अनंत महाराज यांचा अल्पपरिचय गुरुवर्य गुरुदास अनंत महाराज यांचे मूळ नाव अनंत साधूराम जांबेकर असे आहे. त्यांचा जन्म रोहा तालुक्यातील आमडोशी या गावी २० ऑक्टोंबर १९४८ रोजी झाला. त्यांनी शिवभक्त साधूराम शिवराम जांबेकर व तुळसाबाई जांबेकर या दापंत्यांच्या पोटी जन्म घेतला. गुरुवर्य अनंत महाराज यांनी सन १९६६ ला नागोठणे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ठाणे येथे जाऊन अंबरनाथ येथील केमिकल कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून दोन वर्ष काम केले. त्यानंतर २० जुलै १९६८ साली गुरुपौर्णिमेला आपला मावस भाऊ नारायण जाधव यांच्या सोबत मुंबई गोरेगाव येथील मठात जाऊन राजाधिराज श्री समर्थ सद्गुरु सदानंद महाराज यांच्याकडून नाम उपदेश घेतला. गुरुवर्य अनंत महाराज यांची हळूहळू गुरुभक्तीची ओढ वाढत गेली. त्याच वेळी समर्थ सद्गुरु सदानंद महाराज यांनी १९७० साली देह ठेवला. नंतर त्यांच्या गुरुभगिनी राजाधिराज श्री समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराज यांच्या सहवासात गुरुस्थानी राहण्याचा अनंत महाराज यांना योग आला. त्यांना सन १९७० ते सन १९८५ पर्यंत श्री समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराज यांचा सहवास लाभला. त्या काळात अनंत महाराजांनी मेडिसिन कंपनीमध्ये नोकरी करून गोरेगाव मठाची धुरा सांभाळण्यास श्री समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराजांना मदत केली. तसेच आपल्या गुरूचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी श्री समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराजांना घेऊन महाराज आपल्या आमडोशी या मूळ गावी प्रस्थान झाले. गुरु आज्ञानुसार आपल्या वडिलोपार्जित जागेत १९७३ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गुरुवर्य सदानंद महाराजांच्या अस्थी समाधीत ठेवून सदानंदाश्रम या मठाची स्थापना करण्यात आली. यावेळी कोल्हापूर कणेरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना केली. समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराजांना बरोबर घेऊन १९९६ पर्यंत मठाची देखरेख चालू ठेवली. त्यानंतर २८ मे १९९६ साली गुरुमाऊली ताईसाहेब महाराजांनी देह ठेवला. त्यानंतर अनंत महाराजांनी मूळ मठात माऊलीची समाधी बांधून त्यावर पादुकांची स्थापना केली. तसेच मठाच्या पाठीमागे ज्याठिकाणी सद्गुरु ताईसाहेब महाराजांना अग्नी दिली त्याठिकाणी सुंदर असे ध्यानमंदिर बाधून शांतीकुटिर मठाचे मठाधिपती सद्गुरु गणपतराव महाराजांच्या हस्ते मठावरील शिखरावर कलशारोहण करण्यात आले. २८ मे २०२१ रोजी माऊलीच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वेळी समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुंदर असे भक्तीचे स्थान निर्माण करून अनंत महाराजांनी अनेक मूमुक्ष जणांना भक्तीमार्गाला लावले आहेत. अशा प्रकारे धार्मिक कार्य करून अनंत महाराज यांनी आज खऱ्या अर्थाने आमडोशी या गावाला श्रीक्षेत्र म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यांनी मठामध्ये गोशालेची स्थापना केली आहे. |
