मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कामाचे शुभारंभ
बसस्थानकासाठी सरपंच ज्योती परकर यांचा यशस्वी पुढाकार
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या मध्यवर्ती ठिकाणी मागील तीन वर्ष एसटी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी सातत्याने होत होती. अखेर सरपंच ज्योती परकर यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने सुसज्ज नवीन बसस्थानकाच्या बांधकामाचे शुभारंभ बुधवारी करण्यात आले.
बोर्लीपंचतन शहरात २०२१ मध्ये अतिक्रमन कारवाईत बसस्थानक हटवण्यात आले. त्यामुळे जुन्या बसस्थानक ठिकाणी मोकळ्या भूखंडावर नव्याने बसस्थानक बांधण्यात यावे. अशी मागणी जनमानसातून करण्यात आली. मात्र, बसस्थानकाचा तिढा सुटता सुटत नव्हता. यासाठी गेली तीन वर्ष माध्यमातून समस्येला प्रखरतेने मांडण्यात आले.
तालुक्यातील बोर्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ४२ गाव – खेड्यांचा तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी – जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या – जाणाऱ्या ७८ गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांकडे नेहमीच नागरिक प्रवास करत असतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना नियमित प्रवसाकरिता लागणारे पास या सर्व बाबींची सुविधा आता नूतन बसस्थानकामुळे मिळणार असून विना शेडचा उन्हाळी पावसाळी होणारा त्रास दूर होणार आहे.
या शुभारंभ सोहळ्याला मंत्री आदिती तटकरे, महमद मेमन, सुकुमार तोंडलेकर, श्यामकांत भोकरे, ज्योती परकर, गणेश पाटील, सायली गाणेकर, सुचिन किर, ऋषिकेश गोळे, ज्योत्ना हेदुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
