किरण लाड
नागोठणे : सातासमुद्रापार ज्याच्या बासरीने समस्त रसिकांना वेड लावले असा छोटा बासरी वादक मास्टर मेघ पोटे दसऱ्याच्या दिवशी नागोठण्यात आपली कला सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
नागोठण्याची ग्रामदेवता, नवसाला पावणारी माता जोगेश्वरीचा शारदीय नवरात्रोत्सव धुमधडाक्यात, उत्साहात सुरु आहे. उत्साह, आनंद, भक्ती याचा संगम मंदिर परिसरात बघायला मिळत असून मंदिर दररोज भक्तांनी फूलुन जात आहे. खडकआळी, आंगरआळी, कुंभारआळी, मराठाआळी, गवळआळी, कोळीवाडा, भोय ग्रामस्थ, रामनगर या ग्रामस्थ आळींचा पहारानवरात्रौत्सव दिवशी मंदिरात असतो. नवरात्रौत्सवानिमित्त मंदिरात दररोज गरबा, धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सूरु आहे. रविवार, दि. 15 ऑक्टोबरपासून माता जोगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवाला सुरुवात झालेली आहे. पंडित रुपक कुलकर्णी यांचा १० वर्षीय शिष्य मास्टर मेघ निलेश पोटे याचा बासरी वादनाचा कार्यक्रम मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता माता जोगेश्वरी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
बासरी वादक मास्टर मेघ बद्दल सांगायचं म्हणजे तो प्रसिद्ध बासरी वादक पंडित रुपक कुलकर्णी यांचा शिष्य तसेच प्रसिद्ध कान्हा प्ल्यूटचे निर्माते निलेश पोटे यांचे सुपुत्र आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे मुळगाव असलेला मेघ जून 2020 मध्ये बासरी वाजवायला शिकला. शास्रीय तसेच उपशास्त्रीय वादनाची कला अवगत करुन 2021 मध्ये कॅनडा येथे आयोजित ऑनलाईन म्युझिक स्पर्धेमध्ये मेघ याने प्रथम क्रमांक पटकाविला. एप्रिल 2023 मध्ये बेंगलोर येथील म्युझिक कंपनीला जिंगलसाठी स्वतः म्युझिक कंपोज करुन दिले आहे. त्याने ठाणे येथील युनिटी फेस्टिवलमध्ये बासरी वादन केले आहे. महाराष्ट्रा बाहेर बडोदा गुजरात येथील कार्यक्रमात दहा हजार रसिक प्रेक्षकांसमोर बासरी वाजवून त्यांना मंत्रमुग्ध केले होते. अशा या प्रसिद्ध बासरी वादक मेघ याचा बासरी वादनाचा कार्यक्रम दसऱ्याच्या दिवशी माता जोगेश्वरी मंदिरात रंगणार असुन त्याला तबल्याची साथ मनोज गुरव यांची लाभणार असून या कार्यक्रमाच्या निवदेकाची भुमिका प्रविण धाडसे पार पाडणार आहेत. या सुंदर, आकर्षक कार्यक्रमासाठी नागोठणे तसेच विभागातील रसिक प्रेक्षकांनी, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन माता जोगेश्वरी, भैरवनाथ व व्याघ्रेश्वर महाराज उत्सव कमिटीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, त्यांचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.
