• जमिनीच्या मोजणीसाठी २० महिने आणि चौथ्यांदा तारीख!
• श्रीवर्धन येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा नवीन प्रताप समोर आला आहे. शेतकऱ्यांना जमीन लवकरच मोजणी हवी असल्यास अतितातडीच्या मोजणीसाठी अर्ज करून देखील तब्बल वीस महिने लावले असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चौथ्यांदा तारीख देऊनही येथील अधिकारी व कर्मचारी मोजणी करीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
याबद्दल पीडित शेतकऱ्याकडून मिळालेली माहिती अशी कि, मूळ आसुफ येथील शेतकरी असलेले मात्र, कामानिमित्त पुणे येथे राहत असलेले रियाज मोमीन यांनी अतितातडीच्या जागा मोजणीसाठी डिसेंबर २०२१ मध्ये अर्ज केला होता. त्यानंतर त्याची शासकीय फी देखील भरली गेली मात्र, त्यानंतर सर्व्हेअर आला पण जागा साफ नसल्याचे जुजबी कारण देत मोजणी न करताच निघून गेला.
त्यानंतर भूमी अभिलेखकडून शेतकऱ्यांना पुन्हा अतीतितातडीची मोजणी फी भरायला सांगण्यात आली, ती देखील भरली. मात्र, त्यानंतरही दोनदा श्रीवर्धन भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केली नाही. एका अतितातडीच्या मोजणीसाठी दोन्ही मोजणी शुल्क भरूनही तब्बल वीस महिने ताटकळत ठेवण्यात आले असल्याने आता भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जागामालक मोमीन यांनी भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. भूमी अभिलेखच्या अशा वागण्याला तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे याकडे कुणी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा संतप्त सवाल आता जनता विचारू लागली आहे.
बुधवारी (ता. १८) मोजणीची चौथ्यांदा तारीख दिली असताना कर्मचारी संध्याकाळ झाली तरी आले नव्हते. तेव्हा कर्मचारी निवडणूक कामात असल्याचे सांगितले.
-रियाज मोमीन,
जागा मालक
कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यात निवडणुक कामाची जबाबदारी असल्याने अनेक जागा मोजणीची प्रकरणं प्रलंबित आहेत.
-हिरालाल मोरे,
भूमी अभिलेख अधिकारी
