विशेष प्रतिनिधी
नागोठणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर होताच हवशे नवशे तयारीला लागले असून स्वतःच्या पक्षातून उमेदवारी मिळत नसेल तर दुसऱ्या पक्षातून अर्ज भरतो असा धमकीवजा इशारा पुढाऱयांना कार्यकर्ते देताना दिसत आहेत. भाजप, शेकाप आणि काँग्रेस यासोबतच आता शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट तसेच राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट मैदानात असल्याने कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळविण्याकरिता पर्याय वाढले आहेत. त्यामुळेच “देता कि जाऊ” असा धमकीवजा इशारा पुढाऱ्यांना इच्छूक कार्यकर्त्यांकडून मिळताना दिसत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं कि गावपातळीवर विविध आघाड्या होताना दिसतात मात्र, मागील काही काळापासून राजकारणात होत असलेले विविध फेरफार बघता आता ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा लढती होताना दिसत आहे. राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. सीट द्या नाहीतर चाललो ह्या तोऱ्यात असणारा कार्यकर्ता सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना सहन करावा लागत आहे. सरपंच पदाची निवडणूक पुन्हा थेट जनतेतून होत असल्याने सगळ्याच वॉर्डाचा थोडाफार भार देखील सरपंच उचलणार असल्याने इच्छूकांची संख्या देखील वाढलेली बघावयास मिळाली.
जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी अनेक पक्षांचे अंतिम उमेदवार निवडले गेले नव्हते. काहींना तर युती आणि आघाडीचं गणितच मान्य नसल्याने त्यांनी थेट पक्षालाच घरचा आहेत देत त्याच पक्षाचा दुसरा गट देखील स्थापन केला आहे. तर १०० टक्के निवडून येण्याची खात्री असतानाही काही इच्छूकांना पक्षाच्या आदेशानुसार गप्प बसावे लागले आहे. पक्षातून नाहीतर गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वांचेच जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्ष, निष्ठा बासनात गुंडाळून जो तो आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहे. गावाचा विकास, समस्या याबद्दल सध्यातरी कोणीही चर्चा करताना दिसत नाही. मला सीट कशी आणि कुठून मिळेल याच प्रयत्नात सर्व कार्यकर्ता असल्याचे दिसत आहे.
आज शेवटच्या दिवशी दाखल होणारे अर्ज, मागे घेण्याची प्रक्रिया यानंतरच निवडणुकीबाबत अधिक स्पष्टता येणार आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांना सांभाळताना नेत्यांच्या नाकीनऊ येणार आहेत.
राज्यात झालेल्या युत्या आणि आघाड्या ह्या गावपातळीवर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पचनी पडल्या नसल्याचे चित्र सध्यातरी गावागावात पाहावयास मिळत आहे.
