सलीम शेख
माणगाव : कोकण रेल्वेच्या माणगाव स्थानकात शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७:४० वाजता कोच्चिवली ते भावनगर ही पहिली जलद रेल्वे गाडी थांबली. या रेल्वे गाडीचे तसेच रेल्वे गाडी चालकाचे माणगावकर नागरिकांनी नगरीचे माजी नगराध्यक्ष अनंदशेठ यादव यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी एकत्रित येत स्वागत करून दिवाळी साजरी केली.

माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबाव्यात अशी मागणी गेली अनेक वर्षापासूनची समस्त माणगावकरांची होती. या प्रश्नाबाबत नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांनी रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे व कोकण रेल्वे प्रबंधक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली होती. हा माणगावकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. खा. तटकरे यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून माणगावकरांचा हा प्रश्न सोडविला. त्यांनी या प्रश्नासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यामध्ये त्यांना यश येवून माणगाव रेल्वे स्थानकात रविवारी १६३१२ गंगानगर एक्स्प्रेस, मंगळवारी १६३३४ हापा एक्स्प्रेस, बुधवारी १६३३६ गांधीधाम एक्स्प्रेस, गुरुवारी १६३३८ ओखा एक्स्प्रेस, शुक्रवारी १९२५९ भावनगर एक्स्प्रेस, शनिवारी १६३३८ ओखा एक्स्प्रेस या ६ जलद (एक्स्प्रेस) रेल्वेना थांबा मिळाला असल्याने समस्त माणगावकरांनी खा. सुनील तटकरे व केंद्र सरकारचे विशेष जाहीर आभार व ऋण व्यक्त केले आहेत.
खा. तटकरे यांच्या प्रयत्नांनी माणगाव रेल्वे स्थानकात सहा जलद रेल्वेना थांबा देण्यात आला आहे. त्यापैकी एक असलेली कोच्चीवली – भावनगर ही पहिली जलद रेल्वे गाडी शुक्रवारी सायंकाळी माणगाव रेल्वे स्थानकात थांबल्यावर माणगावकरांनी तसेच रेल्वे प्रवासी संघटना व व्यापारी वर्गाने या रेल्वे गाडीला हार घालून व गाडीचे मोटरमन (चालक) यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी माणगावकरांनी माणगाव स्थानकातून या गाडीत बसणारे पहिले प्रवासी माणगावमधील ए-वन स्विट मार्टचे मालक छगनलाल बोराना यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष अनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर मसुरे, सचिन शरद देसाई, नगरसेवक जयंत बोडेरे, डॉ. मोहन दोशी, प्रेमराज नायर, राजेश छेडा, अलीभाई यतीनमणी, चंदुलाल गुप्ता, रामदास पुराणिक, महामुद धुंदवारे, उमर परदेशी, सुरेश जैन, पंकज जैन, चेतन गवाणकर,नामदेव डवळे, नाना जाधव आदींसह माणगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव म्हणाले की, माणगावकरांची तसेच परिसरातील नागरिकांची होणारी अडचण विचारात घेऊन कोकण रेल्वेच्या या जलद गाड्यांना माणगावात थांबा मिळावा याकरिता आपण माणगावकरांच्यावतीने आपले नेते खा. सुनील तटकरे साहेब व कोकण रेल्वे प्रबंधक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. मला बोलताना आनंद होतोय की, आपल्या या प्रश्नाकडे तटकरे साहेबांनी जातीने लक्ष घालून केंद्रात हा प्रश्न उपस्थित केल्याने आज या जलद गाड्यांना माणगावात थांबा मिळाला आहे. मी समस्त माणगावकरांतर्फे खा. सुनील तटकरे व कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करीत असल्याचे सांगितले.
