शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असणारे उमेदवार 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निश्चित होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग न करता निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, नागोठण्यातील जनता सुज्ञ असून निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याचा मला विश्वास असून नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडेल यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप पोमण यांनी केले.
नागोठणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 करिता दिनांक 05/11/2023 रोजी मतदान व दिनांक 06/11/2023 रोजी मतमोजणी होणार असून या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे थेट सरपंच व सदस्य पदाकरिता निवडणूक लढविणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पाडावी यासाठी नागोठणे पोलीस स्टेशनच्यावतीने शनिवारी (दि. 25) सायंकाळी 6.30 वाजता निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सपोनि संदीप पोमण बोलत होते.
यावेळी नागोठणे माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, संजय महाडिक, बाळासाहेब टके, चंद्रकांत गायकवाड, मोहन नागोठणेकर, श्रेया कुंटे, शितल नांगरे, प्रियांका पिंपळे, ज्ञानेश्वर साळुंखे, ॲड. महेश पवार, संजय नांगरे, प्रकाश कांबळे, भरत गिजे, अशपाक पानसरे, सद्दाम दफेदार, सागिर अधिकारी, अनिल महाडिक, प्रफुल नागोठणेकर, संतोष नागोठणेकर, जितेंद्र जाधव, धनंजय जगताप आदींसह पोहा. विनोद पाटील उपस्थित होते.
