बेदरकार वाहन चालकांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका
शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे शहरा लगत असणाऱ्या मीरामोहद्दीन शहा बाबा सर्कल जवळून चारही दिशांनी छोटी-मोठी वाहने नागोठणे बाजारपेठेत येत असतात. त्याचप्रमाणे याच सर्कल वरून काही वाहने पेण फाट्याकडून महामार्गांकडे, रिलायन्स, सुप्रीम कंपनीकडे तसेच रोहा येथील धाटाव एमआयडीसी कडे मोठ्या संख्येने जात असतात. येथूनच होली एंजल स्कूल, एस.डी परमार भारती एज्युकेशन सोसायटी, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल तसेच नागोठणे विद्यासंकुलात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकण्यासाठी येतात. पेणफाटा ते नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान कुठेही गतिरोधक नसल्यामुळे बेदारकपणे वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या जीवातास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम खात्याने या महत्वपूर्ण बाबी कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या सर्कल जवळून नागोठणे शहरालगत खेडेगावातून दररोज अनेक नागरिक मोठ्या संख्येने शहरात कामानिमित्त येत असतात. यामध्ये काही चालत तर काही मोटरसायकल वरून प्रवास करतात. दरम्यान या रस्त्यांना गतिरोधक नसल्याने वाहनचालक वेगाने आपली वाहन चालवतात त्यामुळे येथे वाहनांची अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ते वाहतूक व बांधकाम विभागाने लवकरात लवकर येथील सर्कलजवळील रस्त्यावर गतिरोधक बांधण्याची मागणी होत आहे.
शासकीय विश्राम गृहा जवळ जिंदाल तसेच रिलायन्स स्कूलच्या बसेस लहानग्या विद्यार्थ्यांना घेणे व सोडण्याकरिता थांबतात. सदर जागी पालक व विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असताना वेगाने वाहन चालवणारे मोटरसायकल स्वार, प्रवासी वाहने (रिक्षा मिनिडोअर, मॅजिक, इको) तसेच मालवाहतूक करणारे टेम्पो, पिकअप आदी वाहने येतात. त्यामुळे येथेही भविष्यात अपघात होऊ शकतो. त्यामुळे नागोठणे शहरालगतच्या अशा अपघाती ठिकाणी गतिरोधक बांधणे काळाची गरज बनली आहे. या गंभीर विषयी रस्ते वाहतूक व बांधकाम विभागाने दखल घेऊन सदर समस्या सोडवावी अशी विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.
