मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या दसरा मेळाव्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबईचा डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
आम्ही बहुतांश डबेवाले आणि आमचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक आहोत. यापुढेही राहू; परंतु मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी व मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम पाहता यंदाच्या वर्षी डबेवाला शिवतीर्थावर मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. पहिले मराठा आरक्षण; नंतर पक्ष अशी आमची भूमिका आहे, असे तळेकर यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण हा मराठा जातीचा लढा आहे. तो आम्हालाच लढावा लागणार आहे. सध्या या लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य असल्यामुळे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आम्ही वाजत-गाजत, गुलाल उधळत जात होतो.
मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील; परंतु मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या लढ्याला शक्य तितके बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे तळेकर म्हणाले.
